वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:10 IST2025-10-09T19:08:32+5:302025-10-09T19:10:03+5:30
Nobel Prize 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार नोबेल शांतता पुरस्काराची मागणी करत आहेत.

वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
Nobel Prize 2025: जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणारा नोबेल शांतता पुरस्कार या वर्षी कोणाला मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजता नोबेल कमिटी विजेत्याचे नाव जाहीर करणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली नोबेलची मागणी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. त्यांचा दावा आहे की, त्यांनी 8 मोठी युद्धे थांबवली त्यामुळे त्यांना नोबेल मिळायला हवा. त्यांनी 50 हून अधिक वेळा भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबवल्याचा दावाही केला आहे. मात्र, तज्ज्ञांचे मत याच्या अगदी उलट आहे. स्वीडिश प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ज्ञ पीटर व्हॅलेनस्टीन म्हणतात, “डोनाल्ड ट्रम्प यांना यंदा नोबेल मिळणार नाही. गाझा युद्ध थांबले, तर कदाचित पुढील वर्षी त्यांना मिळू शकतो.”
शर्यतीत कोण कोण?
या वर्षी शांततेच्या नोबेलसाठी 338 व्यक्ती आणि संस्थांचे नामांकन आले आहे. मात्र, शुक्रवारी फक्त विजेत्याचे नाव घोषित होईल. उर्वरित नावे पुढील 50 वर्षांसाठी गोपनीय ठेवली जातील. मागील वर्षी हा सन्मान जपानवरील अणुबॉम्ब हल्ल्यातून वाचलेल्या ‘निहोन हिडानक्यो’ या गटाला मिळाला होता, ज्यांनी अण्वस्त्रांवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न केले होते.
या वर्षी चर्चेत असलेले प्रमुख दावेदारः
सूडानची इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम- युद्ध आणि दुष्काळाच्या काळात नागरिकांना मदत करणारे स्वयंसेवक
यूलिया नवलनया- रशियन विरोधी नेते अलेक्सी नवलनी यांच्या पत्नी
OSCE (ऑफिस फॉर डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स अँड ह्यूमन राइट्स)- निवडणुकीवर देखरेख ठेवणारी संस्था
UN संस्थाही शर्यतीत
काही जाणकारांचे म्हणणे आहे की, नोबेल कमिटी संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस, UNHCR (शरणार्थी आयुक्तालय) किंवा UNRWA (फिलिस्तीनसाठी मदत संस्था) यांना पुरस्कार देऊ शकते. या संस्थांनी गेल्या वर्षभरात गाझा आणि मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले आहे.
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
काहींचे मत आहे की, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस किंवा पत्रकार संरक्षण संघटना- रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (RSF) यांनाही सन्मान दिला जाऊ शकतो. नोबेल कमिटी अनेकदा अप्रत्याशित विजेते निवडते, त्यामुळे यंदाही सर्व अंदाज खोटे ठरू शकतात.