Nobel Prize 2025: गणितासाठी नोबेल पुरस्कार का दिला जात नाही? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 20:03 IST2025-10-06T19:57:01+5:302025-10-06T20:03:18+5:30
Nobel Prize 2025 Announcements: आजपासून नोबेल पुरस्कार 2025 च्या विजेत्यांची घोषणा सुरू झाली आहे.

Nobel Prize 2025: गणितासाठी नोबेल पुरस्कार का दिला जात नाही? जाणून घ्या कारण...
Nobel Prize 2025: नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. वर्ष 1901 पासून याची सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज(दि.6) 2025 च्या नोबेल विजेत्यांची घोषणा सुरू झाली आहे. यंदा शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंको, फ्रेड राम्सडेल आणि जपानच्या शिमोन सकागुची यांना देण्यात आला आहे.
नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणी केली?
या पुरस्काराची सुरुवात स्वीडनचे शास्त्रज्ञ, अभियंते आणि उद्योजक आल्फ्रेड नोबेल यांनी केली. आपल्या मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मालमत्तेचा मोठा भाग नोबेल पुरस्कार आणि नोबेल फाउंडेशन स्थापनेसाठी दान केला. त्यांच्या 1895 मधील मृत्यूपत्रानुसार, पहिला नोबेल पुरस्कार 1901 साली प्रदान करण्यात आला होता.
BREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 6, 2025
The 2025 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded to Mary E. Brunkow, Fred Ramsdell and Shimon Sakaguchi “for their discoveries concerning peripheral immune tolerance.” pic.twitter.com/nhjxJSoZEr
नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिले जातात?
नोबेल पुरस्कार सहा प्रमुख विषयांसाठी दिला जातो. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान/वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या विषयांचा समावेश आहे. मात्र, गणितासाठी नोबेल पुरस्कार का दिला जात नाही?
गणितासाठी नोबेल पुरस्कार का नाही?
अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूपत्रात केवळ व्यावहारिक आणि मानवकल्याणाशी निगडित शोधांनाच पुरस्कार देण्याचा उल्लेख होता. त्यांच्या मते गणित हे अत्यंत सैद्धांतिक (थिअरेटिकल) क्षेत्र आहे आणि लोकांना थेट लाभ देणारे नाही. म्हणूनच गणिताला नोबेल पुरस्कारांत स्थान मिळाले नाही.
मात्र, गणितज्ञांसाठी आजही दोन प्रतिष्ठित पुरस्कार दिले जातात. यामध्ये एबेल पुरस्कार (Abel Prize) आणि फिल्ड्स मेडल (Fields Medal) यांचा समावेश आहे. हे दोन्ही पुरस्कार “गणितातील नोबेल” म्हणून ओळखले जातात.
120 वर्षांची गौरवशाली परंपरा
नोबेल पारितोषिकांची सुरुवात 120 वर्षांपूर्वी झाली. 1901 साली विविध क्षेत्रांतील पहिल्या नोबेल विजेत्यांमध्ये विल्हेल्म रॉन्टगन (भौतिकशास्त्र, एक्स-रेचा शोध), जॅकोबस हेनरिकस व्हान ’टी हॉफ (रसायनशास्त्र), एमिल वॉन बेह्रिंग (वैद्यकशास्त्र), सुली प्रुधोम (साहित्य), जीन-हेन्री डुनां आणि फ्रेडरिक पासी (शांतता) यांचा समावेश होता. पहिले भारतीय नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर होते, ज्यांना 1913 साली साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.