ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:10 IST2026-04-09T12:08:07+5:302026-04-09T12:10:15+5:30
Nobel Peace Prize demand by Pakistan: अमेरिका-इराण शस्त्रसंधीत मध्यस्थी केल्याचा दावा करत पाकिस्तानमध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ आणि जनरल असीम मुनीर यांना नोबेल शांती पुरस्कार देण्याची मागणी होत आहे.

ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या मर्यादित शस्त्रसंधीनंतर आता शेजारील देश पाकिस्तानमध्ये विचित्र मागण्यांना उधाण आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना 'नोबेल शांती पुरस्कार' देण्यात यावा, असा सूर पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील चर्चेत उमटू लागला आहे.
नुकताच अमेरिका आणि इराण दरम्यान शस्त्रसंधीचा निर्णय जाहीर झाला. या घडामोडीत पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचा दावा तिथल्या माध्यमांकडून केला जात आहे. पाकिस्तानी टीव्हीवरील एका पॅनेल चर्चेदरम्यान असा दावा केला की, "जगात आजच्या घडीला शांततेसाठी प्रयत्न करणारे शरीफ आणि मुनीर हेच दोन सर्वात मोठे नेते आहेत. त्यामुळे जगाने त्यांना या पुरस्कारासाठी नामांकित करावे."
फसलेली मध्यस्थी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पवित्रा
एककीकडे पाकिस्तानमध्ये कौतुकाचा वर्षाव होत असला, तरी दुसरीकडे या शस्त्रसंधीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीच्या दुसऱ्याच दिवशी स्पष्ट केले की, "आमचे सैन्य अजूनही सज्ज आहे." इतकेच नाही तर, पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या अटींबाबत शहबाज शरीफ यांनी केलेला दावा देखील अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी फेटाळून लावला आहे.
भारत-पाकिस्तानच्या युद्धावेळी युद्ध थांबविल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. यानंतरही ते अनेकदा दावा करत होते. दोन अणुशक्तींमधील युद्ध थांबविल्यामुळे तसेच जगातील काही तंटे सोडविल्याने आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, अशी मागणी ट्रम्प करत होते. आता पाकिस्तानमधून त्यांच्या नेत्यांना नोबेल मिळावा अशी मागणी केली जात आहे.
थोडक्यात सांगायचे तर, प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती अनिश्चित असताना केवळ चर्चेच्या जोरावर आपल्या नेत्यांना 'नोबेल' मिळावे, अशी स्वप्ने पाकिस्तानी माध्यमांकडून पाहिली जात असल्याने सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.