'जमिनीवरील सैन्याची गरज नाही': रियाध'मधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी घेतला यू-टर्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 10:57 IST2026-03-03T10:46:11+5:302026-03-03T10:57:25+5:30
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध वाढतच चालले आहे. रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली, तर सौदी अरेबियाने चार प्रोजेक्टाइल पाडले.

'जमिनीवरील सैन्याची गरज नाही': रियाध'मधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी घेतला यू-टर्न
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, डोनाल्ड्र ट्रम्प यांनी इराणमध्ये सैन्य उतरवणार असल्याचा इशारा दिला. याचवेळी रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली आहे. सौदी अरेबियाने चार प्रोजेक्टाइल पाडल्याचा दावा केला. तर आज ट्रम्प यांनी मंगळवारी यू-टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. इराणमध्ये जमिनीवर सैन्याची गरज भासणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, सौदी अरेबियातील रियाध येथील अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा आणि सैनिकांच्या मृत्युचा लवकरच बदला घेतला जाईल. सोमवारपर्यंत, या कारवाईत सहा अमेरिकन सैनिक मारले गेले होते.
रियाध'मधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला, मध्य पूर्वेतील युद्ध आणखी वाढले
ट्रम्प यांचे विधान त्यांच्या पूर्वीच्या दाव्यापेक्षा वेगळे आहे. शनिवारी इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी न्यू यॉर्क पोस्टला सांगितले की, "प्रत्येक राष्ट्राध्यक्ष म्हणतात की जमिनीवर कोणतेही सैन्य राहणार नाही. मी असे म्हणत नाही. मी म्हणतो की त्यांची गरज भासणार नाही.
सोमवारी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध तीव्र झाले, त्यात तेहरान समर्थित मिलिशिया सामील झाले आणि हल्ल्यांची श्रेणी मध्य पूर्वेपर्यंत पसरली.
इराणने अरब देशांवर क्षेपणास्त्रे डागली
इराणने इस्रायल आणि अनेक अरब देशांवर क्षेपणास्त्रे डागली, तर हिजबुल्लाहने लेबनॉनमधून रॉकेट आणि ड्रोनने इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलने बेरूतच्या दक्षिण उपनगरांमध्ये आणि दक्षिण लेबनॉनमध्ये जोरदार हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिले. लेबनीज अधिकाऱ्यांनी किमान ३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली, तर इस्रायलने दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाचा इशारा दिला.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अमेरिका-इस्रायली हल्ल्यांमध्ये ही वाढ झाली आहे. इराणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मोहीम सुरू झाल्यापासून शेकडो लोक मारले गेले आहेत, इराणी रेड क्रेसेंटने १३१ शहरांमध्ये किमान ५५५ मृत्यूची नोंद केली आहे.
इराण अमेरिकेशी वाटाघाटी करणार नाही
युद्धादरम्यान तेहरानने आपली भूमिका आणखी कडक केली आहे. वॉशिंग्टन संवादासाठी तयार असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिल्यानंतरही इराण अमेरिकेशी वाटाघाटी करणार नाही, असे वरिष्ठ अधिकारी अली लारीजानी यांनी सांगितले.