न मिसाईल, न रॉकेट! फक्त एका 'गुप्त' ड्रोनने केला मादुरो यांचा गेम; लादेनला शोधणारा 'शिकारी' पुन्हा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:43 IST2026-01-06T12:37:31+5:302026-01-06T12:43:56+5:30
या थरारक मोहिमेत अमेरिकेने कोणत्याही मोठ्या क्षेपणास्त्राचा वापर केला नाही तर..

न मिसाईल, न रॉकेट! फक्त एका 'गुप्त' ड्रोनने केला मादुरो यांचा गेम; लादेनला शोधणारा 'शिकारी' पुन्हा चर्चेत
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून खेचून थेट न्यूयॉर्कच्या तुरुंगात डांबण्यासाठी अमेरिकेने 'ऑपरेशन एब्सोल्यूट रिझॉल्व्ह' राबवले. पण, या थरारक मोहिमेत अमेरिकेने कोणत्याही मोठ्या क्षेपणास्त्राचा वापर केला नाही. मादुरो यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेने आपल्या भात्यातील सर्वात गुप्त आणि शक्तिशाली अस्त्र उपसले होते, ते म्हणजे 'RQ-170 सेंटिनल स्टेल्थ ड्रोन'. याच ड्रोनच्या मदतीने अमेरिकेने मादुरो यांचा 'गेम' केल्याची चर्चा आता जागतिक संरक्षण वर्तुळात रंगली आहे.
रडारलाही चकवा देणारा 'अदृश्य' शिकारी
'RQ-170 सेंटिनल' हे केवळ साधे ड्रोन नाही, तर तो अमेरिकेचा एक असा जासूसी विमान आहे जो शत्रूच्या रडारलाही दिसत नाही. याचे 'फ्लाइंग-विंग' डिझाइन आणि शेपटी नसलेली रचना यामुळे हे ड्रोन हवेत अदृश्य राहून टेहळणी करू शकते. हे ड्रोन अत्यंत उंचीवर उडून इलेक्ट्रॉनिक सिग्नल आणि गुप्त माहिती गोळा करते. शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टमला याची खबरही लागत नाही.
२०११ मध्ये पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यापूर्वी अमेरिकेने याच ड्रोनद्वारे त्याच्या घरावर कित्येक दिवस पाळत ठेवली होती. आता मादुरो यांच्या बाबतीतही तीच रणनीती वापरण्यात आली.
लॅटिन अमेरिकेत आधीपासूनच होता 'तळ'
रिपोर्ट्सनुसार, हे ड्रोन डिसेंबर महिन्यापासूनच लॅटिन अमेरिकेत तैनात करण्यात आले होते. प्यूर्टो रिको येथील अमेरिकन एअरबेसवर या ड्रोनला उतरताना पाहिल्याचा दावा 'द वॉर झोन' या वेबसाइटने केला आहे. मादुरो यांच्या हालचालींवर २४ तास नजर ठेवण्यासाठी या 'स्टेल्थ' ड्रोनचा वापर करण्यात आला, ज्यामुळे अमेरिकन सैन्याला योग्य वेळी हल्ला करून मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेणे सोपे झाले.
जेव्हा इराणने हेच ड्रोन पकडले होते!
RQ-170 ड्रोन हे इतके गोपनीय आहे की अमेरिकन वायुसेना याबद्दल फारशी माहिती जाहीर करत नाही. मात्र, २०११ मध्ये इराणने दावा केला होता की त्यांनी आपल्या हवाई हद्दीत घुसलेले एक RQ-170 ड्रोन हायजॅक करून सुरक्षितपणे जमिनीवर उतरवले होते. त्यानंतर इराणने त्याची नक्कल करून स्वतःचे ड्रोन बनवल्याचाही दावा केला होता.