Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:24 IST2025-12-25T12:23:36+5:302025-12-25T12:24:45+5:30
Nigeria Mosque Explosion News: नायजेरियातील मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट झाला, यात पाच जणांचा मृत्यू आणि ३५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो राज्याची राजधानी असलेल्या मैदुगुरी शहरात बुधवारी संध्याकाळी अत्यंत खळबळजनक घटना घडली. गंबोरू मार्केट परिसरातील एका गजबजलेल्या मशिदीत संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी भीषण बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३५ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी मशिदीत मोठी गर्दी झाली. सर्वजण नमाज पठण करण्यात मग्न असतानाच एका भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, मशिदीच्या भिंतींना तडे गेले आणि परिसरात एकच खळबळ माजली.
तपासात आत्मघातकी हल्ल्याचा संशय
स्थानिक पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून प्राथमिक तपासात हा सुसाईड बॉम्बिंगचा प्रकार असल्याचा संशय आहे. पोलिसांना घटनास्थळावरून संशयित आत्मघातकी जॅकेटचे अवशेष सापडले आहेत. पोलिसांनी तात्काळ परिसराला वेढा घातला असून, परिसरात आणखी काही स्फोटके पेरली आहेत का? याचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले.
दहशतवादी गटांवर संशयाची सुई
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र, या भागात सक्रिय असलेल्या बोको हराम आणि इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांत या दहशतवादी गटांनी यापूर्वीही अशाच प्रकारे प्रार्थना स्थळांना लक्ष्य केले आहे. मैदुगुरी हे शहर गेल्या अनेक वर्षांपासून या गटांच्या हिंसाचाराचे केंद्र राहिले आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
स्फोटातील जखमींना तात्काळ बोर्नो स्टेट स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.