Video: STOP, STOP, STOP...किंचाळत राहिला कंट्रोलर; न्यूयॉर्कमध्ये काही सेकंदात भयानक विमान अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 18:37 IST2026-03-23T18:36:29+5:302026-03-23T18:37:25+5:30
हा अपघात रात्री ११:३८ च्या सुमारास झाला. अपघातानंतर अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्राधिकरण फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने, विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली.

Video: STOP, STOP, STOP...किंचाळत राहिला कंट्रोलर; न्यूयॉर्कमध्ये काही सेकंदात भयानक विमान अपघात
सोमवारी रात्री न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर एक मोठा अपघात घडला. याठिकाणी अग्निशमन दलाच्या ट्रकची एअर कॅनडा एक्सप्रेसच्या विमानाशी टक्कर झाली. अपघाताच्या अगदी आधी एअर ट्रॅफिक कंट्रोलर ट्रक चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत वारंवार "STOP, STOP, STOP" असं ओरडत होता. आता या घटनेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
अपघातापूर्वी कंट्रोलरचा इशारा
व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोलर ट्रक चालकाला धावपट्टी ओलांडण्याची परवानगी देताना ऐकू येतो. मात्र, काही सेकंदांनंतर तो घाबरतो आणि वारंवार "STOP, STOP, STOP" असं ओरडतो. मात्र त्यानंतर काही कळण्याच्या आतच जोरदार टक्कर होते.
विमान आणि ट्रकची टक्कर कशी झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचा ट्रक दुसऱ्या विमानापर्यंत पोहोचण्यासाठी धावपट्टी ओलांडत होता. त्याच वेळी मॉन्ट्रियलहून येणारे एक CRJ-900 विमान धावपट्टी क्रमांक ४ वर उतरत असताना हे विमान त्या ट्रकला धडकले. हे विमान जॅझ एव्हिएशन कंपनीचे होते. या अपघातात पायलट आणि को-पायलट यांचा मृत्यू झाला तर ट्रकमधील एक अधिकारी आणि एका सैनिकाचे हातपाय मोडले. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
🚨#UPDATE: Listen as you can hear panic as air traffic controllers try to divert everyone away from LaGuardia after a jet had collided with a fire truck numerous injuries and now Fatalities are being reported pic.twitter.com/sU7OjwB2ol
— R A W S A L E R T S (@rawsalerts) March 23, 2026
धावपट्टीवर अग्निशमन दलाचा ट्रक का आला?
युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात विचित्र वास आल्यानंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली. याच कारणास्तव अग्निशमन दलाच्या ट्रकला बोलावण्यात आले होते आणि तो विमानाच्या दिशेने जात होता. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार२४ (Flightradar24) नुसार विमानाची ट्रकशी टक्कर अंदाजे ३९ किमी प्रति तास वेगाने झाली. हा अपघात रात्री ११:३८ च्या सुमारास झाला. अपघातानंतर अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्राधिकरण फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने, विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली.
दरम्यान, अपघातापूर्वीच खराब हवामानामुळे विमानतळावरील उड्डाणांवर परिणाम झाला होता. या घटनेनंतर परिस्थिती आणखी बिघडली आणि अनेक प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.