आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:54 IST2025-10-24T12:54:02+5:302025-10-24T12:54:38+5:30
उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये पुन्हा तणाव वाढला!

आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
North-South Korea: दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामधील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. गेल्या काही महिन्यांपासून उत्तर कोरिया सातत्याने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करत आहे, ज्यामुळे आशियात अस्थिरता वाढली आहे. अशातच, दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या 20 सैनिकांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर कोरियाला चीन आणि रशियाचा पाठींबा आहे, तर दक्षिण कोरिया अमेरिका आणि जपानचा मित्रराष्ट्र आहे. त्यामुळे या दोन देशांतील संघर्ष हा थेट आशियाई शीतयुद्धाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियन सैनिकांवर केलेला गोळीबार केवळ इशारा नाही, तर उत्तर कोरियाच्या आक्रमक हालचालींना दिलेले स्पष्ट प्रत्युत्तर आहे. विशेषतः बफर झोनमध्ये स्फोटके पेरण्याच्या प्रयत्नांना दिलेली तीव्र प्रतिक्रिया आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना गंगवॉन प्रांतातील चेओरवॉन येथे घडली. दक्षिण कोरियाच्या सैनिकांनी आधी इशारा दिला, त्यानंतर गोळीबार केला. गोळीबारानंतर उत्तर कोरियाचे सैनिक मागे हटले. अशा पार्श्वभूमीवर, अमेरिका, चीन, आणि रशिया या महासत्तांची पुढील भूमिका अत्यंत निर्णायक ठरेल. कारण सध्या युरोपमध्ये युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेत इस्रायल-हमास संघर्ष सुरू आहे; त्यात आशियात आणखी एक युद्ध पेटण्याच्या शक्यतेने जागतिक स्थैर्य धोक्यात येऊ शकते.
तणाव वाढण्याची कारणे
बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचण्या - उत्तर कोरियाने अलीकडे अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. त्यापैकी एक चाचणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान दौऱ्याची घोषणा केल्यानंतर करण्यात आली.
अण्वस्त्रांवरील मतभेद - दक्षिण कोरिया, उत्तर कोरियावर अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी दबाव आणत आहे, पण किम जोंग उन यांनी हे पूर्णतः नाकारले आहे. त्यांच्या बहिणीने सांगितले की, “हे कोणत्याही परिस्थितीत होणार नाही.”
राजनैतिक पार्श्वभूमी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुढील आठवड्यात APEC शिखर परिषदेत दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांची भेट घेऊ शकतात. उत्तर कोरिया या भेटीपूर्वी अमेरिकेला आपल्या लष्करी शक्तीची झलक दाखवत आहे.