भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारावरून सध्या जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास तयार असल्याचा दावा केला होता. आता यावर रशियाने आपली अधिकृत आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. "भारत हा एक सार्वभौम देश असून तो कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे," असे रशियाने ट्रम्प यांना सुनावले आहे.
रशियाने ट्रम्प यांचा दावा फेटाळला
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, रशियाला भारताकडून तेल खरेदी बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही. पेसकोव म्हणाले, "रशिया हा भारताला तेल पुरवणारा एकमेव देश नाही, हे सर्वांना ठाऊक आहे. भारत अनेक देशांकडून ऊर्जा उत्पादने खरेदी करतो, त्यामुळे ट्रम्प यांच्या विधानात आम्हाला काहीही नवीन वाटत नाही."
अमेरिकन तेल रशियन तेलाची जागा घेऊ शकत नाही!
रशियाच्या 'नॅशनल एनर्जी सिक्युरिटी फंड'चे तज्ज्ञ इगोर युशकोव यांनी या वादात तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यांच्या मते, भारतीय तेल कंपन्या रशियन तेलाची आयात पूर्णपणे थांबवू शकत नाहीत. युशकोव म्हणाले की, "अमेरिका ज्या 'शेल ऑईल'ची निर्यात करतो ते हलक्या दर्जाचे असते, तर रशियाकडून मिळणारे 'युराल्स' तेल जड आणि सल्फरयुक्त असते. भारतीय रिफायनरींचा ढाचा रशियन तेलासाठी अधिक अनुकूल आहे. जर रशियन तेलाऐवजी अमेरिकन तेल वापरायचे असेल, तर त्यासाठी रिफायनरीमध्ये मोठे बदल करावे लागतील आणि खर्चही वाढेल."
ट्रम्प यांची केवळ राजकीय खेळी?
रशियन तज्ज्ञांच्या मते, रशिया दररोज भारताला १५ ते २० लाख बॅरल तेलाची निर्यात करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेल पुरवठा करण्याची क्षमता सध्या अमेरिकेकडे नाही. "असे वाटते की ट्रम्प केवळ जगाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांनी व्यापार युद्धात विजय मिळवला आहे आणि भारत त्यांच्या अटींवर करार करण्यास तयार झाला आहे," अशी टीकाही रशियातून होत आहे. एकीकडे अमेरिका आपला व्यापार वाढवण्यासाठी दबाव टाकत आहे, तर दुसरीकडे रशिया भारतासोबतचे जुने संबंध आणि ऊर्जेची गरज अधोरेखित करत आहे.
Web Summary : Russia refuted Trump's claim that India would halt Russian oil imports. Russia asserts India's sovereign right to purchase oil from any nation, highlighting existing strong energy ties and questioning America's capacity to replace Russian oil supplies.
Web Summary : रूस ने ट्रम्प के इस दावे का खंडन किया कि भारत रूसी तेल का आयात बंद कर देगा। रूस का कहना है कि भारत को किसी भी देश से तेल खरीदने का संप्रभु अधिकार है, और अमेरिका के रूसी तेल आपूर्ति को बदलने की क्षमता पर सवाल उठाया।