'भारतातील अयोध्या बनावट, खरी अयोध्या नेपाळमध्ये; प्रभू राम भारतीय नव्हते, ते तर नेपाळी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 21:32 IST2020-07-13T21:13:25+5:302020-07-13T21:32:09+5:30
नेपाळच्या पंतप्रधानांचा दावा; भारतानं सांस्कृतिक अतिक्रमण केल्याचा आरोप

'भारतातील अयोध्या बनावट, खरी अयोध्या नेपाळमध्ये; प्रभू राम भारतीय नव्हते, ते तर नेपाळी'
काठमांडू: राजकीय संकटात सापडल्यानं खुर्ची जाण्याची भीती असलेले नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आता भारतावर निशाणा साधला आहे. भारतानं सांस्कृतिक अतिक्रमण करून बनावट अयोध्या निर्माण केली. खरीखुरी अयोध्यानेपाळमध्ये आहे. प्रभू राम भारतीय नसून ते नेपाळी आहेत, असा दावादेखील ओली यांनी केला. आपल्याला पंतप्रधान पदावरून दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप याआधी ओली यांनी केला होता.
Real Ayodhya lies in Nepal, not in India. Lord Ram is Nepali not Indian: Nepali media quotes Nepal Prime Minister KP Sharma Oli (file pic) pic.twitter.com/k3CcN8jjGV
— ANI (@ANI) July 13, 2020
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं भारतविरोधी भूमिका घेणारे केपी शर्मा ओली सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांचं पंतप्रधानपद धोक्यात आहे. ते टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता त्यांनी थेट भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. नेपाळवर सांस्कृतिक अत्याचार करण्यात आले. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आली, असं ओली कवी भानुभक्त आचार्य जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले.
राजपुत्र असलेल्या रामाला आम्ही सीता दिली, असं आम्ही आजही मानतो. मात्र आम्ही भारतात असलेल्या अयोध्येच्या राजकुमाराला सीता दिली नाही. अयोध्या नावाचं गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे. मात्र भारतातील अयोध्या खरीखुरी नाही, असा दावादेखील ओली यांनी केली. भारतातील अयोध्या खरी असेल तर मग तिथला राजकुमार लग्नासाठी जनकपूरला कसा येऊ शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती आणि विकास नेपाळमध्ये झाल्याचा दावाही त्यांनी केला.
केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी
नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ओली यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित केल्यानंतर आता ओली एक अध्यादेश आणून पक्षच फोडतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षांतर्गत अडचणी वाढल्यानं ओली आता थेट मुख्य विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं वृत्त इकॉनॉनिक टाईम्सनं दिलं आहे. सत्तेवर कायम राहण्यासाठी ओली यांनी अध्यादेश आणून राजकीय पक्षांशी असलेल्या कायद्यात बदल करण्याची तयारी सुरू केली आहे.