धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 07:05 IST2025-09-10T07:05:02+5:302025-09-10T07:05:50+5:30

राष्ट्राध्यक्षांसह प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानांवर निदर्शकांचा हल्ला; नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांचा राजीनामा

Nepal in flames: Parliament set on fire; Supreme Court and Attorney General's office vandalized | धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड

धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड

काठमांडू : समाजमाध्यमांवरील बंदी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि सरकारविरुद्ध वाढता असंतोष यामुळे नेपाळमध्ये जेन झी या संघटनेच्या प्रेरणेने व विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जनआंदोलनाचा जोरदार तडाखा बसल्याने नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

संतप्त निदर्शकांनी संसद भवनातही जाळपोळ केली असून प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानांवर हल्ले केले. राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्या निवासस्थानाचीही तोडफोड करण्यात आली आहे.

माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू

नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकार या घरात असतानाच त्यांच्या घराला आग लावण्यात आली. त्यात त्या होरपळल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निदर्शकांनी परराष्ट्र मंत्री अर्जुन राणा देऊबा आणि त्यांचे पती शेर बहादूर देऊबा यांच्या निवासस्थानी हल्ला केला आणि दोघांनाही मारहाण केली.

सुरक्षा रक्षकांच्या शस्त्रांची लूट

पंतप्रधान कार्यालयासह अनेक मंत्रालये काठमांडू येथील 'सिंह दरबार'मध्ये चालवली जातात. नेपाळचे सर्व सरकार येथून चालवले जाते. ही देशातील सर्वांत मोठी प्रशासकीय इमारत आहे. तरुणांनी सिंह दरबारवरही कब्जा करत त्यांनी तेथील सैन्याकडून शस्त्रे हिसकावून घेतली.

'या' नेत्यांच्याही घरांवरही केला हल्ला

निदर्शकांनी ओली यांच्या बाळकोटमधील खासगी निवासस्थानाला आग लावली. तसेच, माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल, मंत्री पृथ्वी सुभ्बा गुरूंग, माजी गृहमंत्री रमेश लेखक यांच्या घरांवरही हल्ला केला. राष्ट्राध्यक्ष पौडेल यांच्या निवासस्थानाचीही नासधूस केली.

Web Title: Nepal in flames: Parliament set on fire; Supreme Court and Attorney General's office vandalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.