नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 19:46 IST2025-09-12T19:46:11+5:302025-09-12T19:46:31+5:30
Nepal Gen Z news: भारतात शिकलेल्या आणि भ्रष्टाचार विरोधी अशी ओळख असलेल्या नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
नेपाळमध्ये तरुणांच्या हिंसक निदर्शनांनी संसदेसह सर्व सरकारी, खासगी मालमत्तांची जाळपोळ करण्यात आली. मंत्र्यांना पळवून पळवून मारहाण करण्यात आली. आजी-माजी खासदारांनी आता नेपाळमधून मिळेल त्या मार्गाने पळ काढला आहे. अशातच नेपाळचे सरकार कोण चालविणार असा प्रश्न उभा राहिला होता. या जेन झेडच्या आंदोलकांनी दोन तीन नावे यासाठी सुचविली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
भारतात शिकलेल्या आणि भ्रष्टाचार विरोधी अशी ओळख असलेल्या नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्की यांनी यासाठी काही अटी ठेवल्या होत्या. त्या मान्य झाल्यानंतरच हा निर्णय झाला असून राजकीय पक्षांच्या विरोधानंतरही नेपाळची संसदही बरखास्त करण्यात आली आहे.
सोशल मीडिया बंद केल्यानंतर जेन झीमध्ये मोठा रोष उफाळला होता. त्यांनी तीन दिवस नेपाळची संसद, सर्वोच्च न्यायालयासह सर्व मालमत्तांची जाळपोळ केली होती. अर्थमंत्र्यांना पळवून पळवून मारले होते. माजी पंतप्रधानांच्या घरावर हल्ला करत त्यांच्या पत्नीला जिवंत जाळले होते. अखेर नेपाळी लष्कराने नेपाळचा ताबा घेतल्यानंतर काहीसे वातावरण निवळत चालले होते. तोवर सर्व राजकीय नेते भूमीगत झाले होते.
शुक्रवारी, जनरेशन-जी नेत्यांनी लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिंगडेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्यासोबत बैठक घेतली. यामध्ये कार्की यांच्या नावावर सहमती दर्शवली गेली. आज रात्री ८:४५ वाजता राष्ट्रपती भवनात त्या अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.