नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:49 IST2026-03-15T12:48:07+5:302026-03-15T12:49:13+5:30
Nepal Bus Accident News: नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात भारतीय भाविकांची बस दरीत कोसळली. ७ जणांचा मृत्यू तर ७ जखमी. वाचा सविस्तर वृत्त.

नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी
नेपाळमधील प्रसिद्ध मनकामना देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भारतीय भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. गोरखा जिल्ह्यातील साहिद लखन गावालगत ही बस खोल दरीत कोसळल्याने किमान सात भारतीय भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवारी संध्याकाळी मनकामना मंदिरातून दर्शन घेऊन ही इलेक्ट्रिक मायक्रो-बस अनबुखैरेनीच्या दिशेने जात असताना 'कांत्तर' भागात एका तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये 15 प्रवासी होते.
बचावकार्य आणि उपचार
अपघातात जखमी झालेल्या सात भाविकांना तातडीने उपचारासाठी चितवन येथील 'चितवन मेडिकल कॉलेज'मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. नेपाळ पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.
नेपाळमधील रस्ते अपघातांचे सत्र
नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांत रस्ते अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. डोंगराळ भाग आणि अरुंद रस्त्यांमुळे येथे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्येही अशाच एका भीषण अपघातात २७ भारतीय भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता.