नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 19:20 IST2025-09-07T19:20:27+5:302025-09-07T19:20:54+5:30
Ganeshotsav 2025 In Germany : जर्मनीमध्ये मराठी समुदायाने उत्साहात साजरा केला गणेशोत्सव

नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
ड्युसलडॉर्फ, जर्मनी : जगभरातील भारतीयांप्रमाणेच जर्मनीतील ड्युसलडॉर्फ शहरातील मराठी व भारतीय समुदायाने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि सांस्कृतिक उत्साहाने साजरा केला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरांतून गणपती बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तब्बल १०० मुलींचे लेझीम खेळ आणि रमण बाग युवा मंच यांचे ढोल ताशा वादन यासह जर्मनीच्या शहरातील ही मिरवणूक आनंदात आणि जल्लोषात पार पडली.
या वर्षी शहराच्या आयुक्त श्रीमती झेपून्कते (Smt. Zepunkte) यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला जमलेल्या सर्व भक्तांनी भावूक होऊन बाप्पाचा निरोप घेतला.
ड्युसलडॉर्फसह आसपासच्या शहरांतून आलेल्या भारतीयांसह, या कार्यक्रमात स्थानिक जर्मन नागरिकांनीही उत्सुकतेने सहभाग घेतला. गणेशोत्सव हा कसा एकात्मतेचे आणि आनंदाचे प्रतीक आहे, याची अनुभूती जर्मन नागरिकांना या उत्सवातून मिळाली. ड्युसलडॉर्फ शहरात गणेशोत्सव मिरवणूक हा वर्षातील एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. याचे सर्व श्रेय 'मराठी मित्र मंडळ' यांना जाते.
'मराठी मित्र मंडळा'चे अध्यक्ष डॉ. प्रसाद भालेराव यांनी यावेळी बोलताना म्हटले की, “गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सण नसून समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे. परदेशात राहूनही आपल्या संस्कृतीचे जतन करणे आणि पुढच्या पिढीपर्यंत ही संस्कृती पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. या उत्सवामुळे समाजातील एकोपा वृद्धिंगत झाला असून, मराठी संस्कृतीला जागतिक स्तरावर नवा आयाम मिळत आहे.”