युद्धाची आग आणखी भडकणार? NATO नंही तैनात केली 100 लढाऊ विमानं; रशियाला दिला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 18:36 IST2022-02-24T18:35:13+5:302022-02-24T18:36:19+5:30
"आमच्याकडे आमच्या हवाई सीमांचे संरक्षण करण्यासाठी 100 हून अधिक जेट आणि उत्तरेपासून भूमध्य सागरापर्यंत समुद्रात 120 हून अधिक युद्धनौकांचा ताफा."

युद्धाची आग आणखी भडकणार? NATO नंही तैनात केली 100 लढाऊ विमानं; रशियाला दिला थेट इशारा
रशियाने युक्रेनमधून तात्काळ माघार घ्यावी आणि लष्करी कारवाई थांबवावी, असा इशारा उत्तर अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनने (NATO) दिला आहे. तसेच, रशियाने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करायला हवे. संपूर्ण जग रशियाचा इरादा ओळखून आहे. रशिया युक्रेनवर बलाचा वापर करत आहे, असे NATO ने म्हटले आहे. एवढेच नाही, तर नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी युक्रेनवरील रशियाची ही कारवाई म्हणजे “निष्कारण आणि अयोग्य हल्ला”, असल्याचे म्हटले आहे.
उत्तर अटलांटिक कौन्सिलच्या सर्वसाधारण बैठकीनंतर ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील NATO च्या मुख्यालयात माध्यामांशी बोलताना स्टोल्टेनबर्ग म्हणाले, आमच्याकडे आमच्या हवाई सीमांचे संरक्षण करण्यासाठी 100 हून अधिक जेट आणि उत्तरेपासून भूमध्य सागरापर्यंत समुद्रात 120 हून अधिक युद्धनौकांचा ताफा आहे. आम्ही आमच्या सहकाऱ्याचा युद्धापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलू.
स्टोल्टेनबर्ग पुढे म्हणाले, "आम्ही रशियाला लष्करी कारवाई तत्काळ थांबवण्यास आणि युक्रेनसह जवळपासच्या भागातील सर्व सैन्य मागे घेण्यास सांगत आहोत."
NATO महासचिवांनी रशियाला आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा पर्णपणे सन्मान करण्याचे आणि सर्व गरजू लोकांना सुरक्षित ठेवण्याची आणि त्यांच्यापर्यंत आवश्यक सहाय्यता पोहोचवण्याची परवानगी देण्याचेही आवाहन केले आहे.