म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:16 IST2025-12-11T12:16:08+5:302025-12-11T12:16:54+5:30
म्यानमार सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. रखाइन प्रांतातील एका रुग्णालयावर १० डिसेंबरच्या रात्री एअर स्ट्राईक झाला, ज्यात ३० लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ७० लोक जखमी झाले.

म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी
म्यानमार सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. रखाइन प्रांतातील एका रुग्णालयावर १० डिसेंबरच्या रात्री एअर स्ट्राईक झाला, ज्यात ३० लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ७० लोक जखमी झाले. बंडखोर गट 'अराकन आर्मी'चे सैनिक या रुग्णालयात उपचार घेत होते किंवा लपून बसले होते, असं म्हटलं जात आहे. म्यानमारच्या लष्कराने किंवा सरकारने या एअर स्ट्राईकबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
१ फेब्रुवारी २०२१ रोजी म्यानमारच्या लष्कराने (तत्मादाव) लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला उलथून पाडलं. आंग सान सू ची यांच्या नेतृत्वाखालील 'नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी' (NLD) पक्षाने २०२० च्या निवडणुकांमध्ये मोठ बहुमत मिळवलं होतं, परंतु लष्कराने निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सत्ता हाती घेतली. यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाली, जी लष्कराने हिंसक दडपशाहीने मोडून काढली.
काही लोकांनी 'पीपल्स डिफेन्स फोर्स' (PDF) ची स्थापना केली, जी 'नॅशनल युनिटी गव्हर्नमेंट' (NUG) चा सशस्त्र विभाग आहे. त्याचबरोबर, कारेन नॅशनल युनियन, काचिन इंडिपेंडन्स ऑर्गनायझेशन देखील लष्कराच्या विरोधात लढत आहेत. हे गट दशकांपासून स्व-शासनाची मागणी करत आहेत.
बंडखोर गटांनी २०२४ पर्यंत देशातील सुमारे ४०-५०% भूभागावर, विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये नियंत्रण मिळवलं होतं. परंतु २०२५ मध्ये लष्कराने प्रतिआक्रमण सुरू केलं आहे. उदाहरणार्थ, ऑक्टोबर २०२५ मध्ये लष्कराने 'ता'अंग नॅशनल लिबरेशन आर्मी' (TNLA) कडून क्यौकमे शहर परत घेतलं. मात्र लष्कराचं अजूनही मोठी शहरं (यांगून, नायपीडॉ) आणि राजधानीवर नियंत्रण आहे. या संघर्षादरम्यान, चीनने लष्कराला लष्करी मदत आणि दबाव टाकून समर्थन दिलं.