‘माउथ ऑफ अमेरिका’: किती औषधं कोंबाल?...तर नफा कमावण्यासाठी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 07:53 IST2025-07-09T07:52:46+5:302025-07-09T07:53:12+5:30
अमेरिकेच्या ढासळत्या आरोग्य व्यवस्थेकडे सरकार, औषध उत्पादक कंपन्या, तज्ज्ञ आणि जनतेचं लक्ष वेधलं जावं हे यामागचं उद्दिष्ट.

‘माउथ ऑफ अमेरिका’: किती औषधं कोंबाल?...तर नफा कमावण्यासाठी!
कोणालाही कुठलाही आजार होवो, अगदी सर्दी-पडसं का होईना, आपण किती गोळ्या, काय काय उपचार घेतो? बऱ्याचदा तर लहान-मोठ्या आजारांसाठीही आपण स्वत:च्या मनानं, ऐकीव माहितीवर किंवा ‘गुगलच्या डोक्यानं’ चालतो आणि भरमसाठ गोळ्या-औषधं तोंडात कोंबतो. अमेरिकेतही यापेक्षा वेगळं काही नाही. तिथे तर परिस्थिती आणखी भयंकर आहे. तेथील आरोग्य व्यवस्थेवर आता अमेरिकेतूनच कोरडे ओढले जात आहेत. अनेक औषध कंपन्या लोकांच्या आरोग्यापेक्षा आपल्याला किती नफा मिळणार याकडे लक्ष ठेवूनच चालवल्या जातात.
अमेरिकेत ‘ओव्हर प्रिस्क्रिप्शन’चा म्हणजेच डॉक्टरांनी गरजेपेक्षा जास्त औषधं, गोळ्या लिहून देण्याचा प्रकारही मोठ्या प्रमाणावर चालतो. समजा एखाद्या रुग्णाला त्याला झालेल्या त्रासानुसार एखाद-दुसऱ्या औषधाच्या गोळीची गरज असेल तरी त्याला भरमसाठ गोळ्या आणि औषधं लिहून दिली जातात. त्यामुळे रुग्णही गरजेपेक्षा जास्त औषधं घेतो किंबहुना रुग्णांना मुद्दाम गरजेपेक्षा जास्त औषधं दिली जातात. - का? तर नफा कमावण्यासाठी!
अमेरिकन आरोग्यव्यवस्था अशी वेगळ्या वळणाकडे चालली असल्यामुळे आणि त्याचा अमेरिकन लोकांच्या आयुष्यावरच विपरीत परिणाम होत असल्यानं या क्षेत्रातील तज्ज्ञ चिंतित झाले आहेत. यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचं आणि मोठं पाऊल उचललं आहे, ते याच क्षेत्रातील ‘विमर्जी’ या सप्लिमेंट कंपनीनं. पूरक आहार आणि व्हिटॅमिनचं उत्पादन करणारी ही मल्टिनॅशनल कंपनी आहे. जगभरात किमान १६ देशांमध्ये या कंपनीची उत्पादनं विकली जातात. अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या धर्तीवर न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रिज पार्कमध्ये ‘लेडी लिबर्टीज माउथ ऑफ अमेरिका’ हे अतिशय भव्य आणि धाडसी संदेश देणारं शिल्प कंपनीनं तयार केलं आहे. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचाच चेहरा या शिल्पाला देण्यात आला असून, या शिल्पाच्या तोंडातून औषधांच्या शेकडो रंगीत गोळ्या ओघळत आहेत.
अमेरिकेच्या ढासळत्या आरोग्य व्यवस्थेकडे सरकार, औषध उत्पादक कंपन्या, तज्ज्ञ आणि जनतेचं लक्ष वेधलं जावं हे यामागचं उद्दिष्ट. अल्पावधीतच या शिल्पानं केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर जगातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी, सातत्यानं वाढत जाणारे आजार, गरज नसताना मुद्दाम अधिकाधिक औषधं घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं जाणं, एकूणच लोकांचा आरोग्य व्यवस्थेवरील उडत चाललेला विश्वास आणि आरोग्य क्षेत्रातील वाढती नफेखोरी.. यावर एक मोठा सामाजिक संदेश यातून देण्यात आला आहे. कंपनीचे ब्रँड अधिकारी फिलिप जॅकब्सन यांचं म्हणणं आहे, ‘या इन्स्टॉलेशनमुळे आपल्याला प्रेरणा मिळेल आणि आपल्या लक्षात येईल की आपली आरोग्य व्यवस्था लोकांना निरोगी ठेवण्यासाठी नव्हे, तर फक्त नफा कमावण्यासाठी बांधील आहे!’
अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या म्हणण्यानुसार अमेरिकेतील ‘प्रिस्क्रिप्शन ड्रग’चा वापर धडकी भरवण्याइतका भीतीदायक आहे. त्यानं आता आपल्या सर्व मर्यादा ओलंडल्या आहेत. अमेरिकेत केवळ २०२० मध्ये तब्बल ६.३ अब्ज प्रिस्क्रिप्शन्स दिली गेली. म्हणजे प्रत्येक अमेरिकन व्यक्तीसाठी अंदाजे १९ प्रिस्क्रिप्शन्स!