इराणच्या 'फकीर' नेत्याचा मुलगा निघाला अब्जाधीश! लंडन ते दुबईपर्यंत मोजताबा खामेनींचे गुप्त साम्राज्य उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:18 IST2026-01-29T18:18:28+5:302026-01-29T18:18:37+5:30
Mojtaba ayatullah Khamenei secret property: इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे सुपुत्र मोजताबा खामेनी यांच्या १,१०० कोटींच्या गुप्त संपत्तीचा पर्दाफाश. लंडन, दुबई आणि जर्मनीतील लक्झरी साम्राज्याचे कनेक्शन उघड.

इराणच्या 'फकीर' नेत्याचा मुलगा निघाला अब्जाधीश! लंडन ते दुबईपर्यंत मोजताबा खामेनींचे गुप्त साम्राज्य उघड
इराणमध्ये एकीकडे सामान्य जनता महागाई आणि गरिबीने होरपळत असतानाच, दुसरीकडे देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोजताबा खामेनी यांच्या अफाट संपत्तीचा खुलासा झाला आहे. ब्लूमबर्ग आणि पाश्चात्य गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार, मोजताबा खामेनी यांचे लंडन, दुबई आणि जर्मनीमध्ये १०० दशलक्ष पौंड (सुमारे १,१०० कोटी रुपयांहून अधिक) पेक्षा जास्त किमतीचे गुप्त गुंतवणूक साम्राज्य पसरलेले आहे.
मोजताबा खामेनी यांनी आपली संपत्ती थेट स्वतःच्या नावावर न ठेवता एका जटिल नेटवर्कचा वापर केला आहे. या प्रकरणाच्या तपासात खालील धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. लंडनच्या अत्यंत महागड्या भागात लक्झरी हवेल्यांशी मोजताबा यांचे नाव जोडले जात आहे. तसेच जर्मनीतील फ्रँकफर्टमधील 'हिल्टन' हॉटेल आणि स्पेनमधील मॅलोर्का येथील लक्झरी रिसॉर्ट्समध्येही या नेटवर्कद्वारे गुंतवणूक केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
या सर्व व्यवहारांच्या केंद्रस्थानी अली अंसारी या इराणी व्यापाऱ्याचे नाव समोर आले आहे, ज्याने इराणमधील सर्वात मोठा 'इराण मॉल' उभारला होता.
इराणमध्ये असंतोष; उत्तराधिकाराच्या शर्यतीला फटका?
८६ वर्षीय अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर इराणचा पुढील सर्वोच्च नेता कोण होणार, याची चर्चा सध्या जोरात आहे. ५६ वर्षीय मोजताबा हे या पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र, एकीकडे स्वतःला 'फकीर' आणि साधे म्हणवून घेणाऱ्या नेतृत्वाच्या मुलाचे हे 'लक्झरी' आयुष्य समोर आल्याने इराणमधील तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इराणवर असलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांना बगल देऊन ही संपत्ती परदेशात हलवण्यात आली आहे. २०२६ च्या सुरुवातीला इराणमध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनांमुळे आधीच सत्ताधारी गट दबावाखाली आहे. अमेरिकेने इराणवर आर्थिक दबाव वाढवलेला असताना हे भ्रष्टाचाराचे प्रकरण खामेनी कुटुंबासाठी डोकेदुखी ठरू शकते.