india Israel: कॅमेरा लावलेली गोळी पोटात गेल्यावर काय होते? कुठून आल्या कल्पना?
By अतुल कुलकर्णी | Updated: November 22, 2025 12:14 IST2025-11-22T12:12:58+5:302025-11-22T12:14:55+5:30
Piyush Goyal Israel visit Peres Center: कॅमेरा लावलेली गोळीपोटात जाते अन् आत काय काय शोध घेते? हा शोध कसा लागला? जाणून घ्या.

india Israel: कॅमेरा लावलेली गोळी पोटात गेल्यावर काय होते? कुठून आल्या कल्पना?
अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल अविव: कॅमेरा लावलेली गोळीपोटात जाते अन् आत काय काय शोध घेते? हा शोध कसा लागला? ड्रीप इरिगेशन, सोलार सिस्टीम चा जन्म कसा झाला? कापसापासून कपड्यापर्यंतचा थरारक प्रवास कसा होता? इथपासून ते तंत्रज्ञानावर तंत्रज्ञानाचा आधार घेत या देशाने शोध लावले तरी कसे, याचे अनोखे सेंटर तेल शहरात उभारण्यात आले आहे. हे सेंटर पाहण्यासाठी येणाऱ्यांपेक्षा दाखवणाऱ्यांमध्ये असणारा उत्साह बघणाऱ्यालाच थक्क करतो.
इस्रायलचे दिवंगत राष्ट्रपती आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते शिमोन पेरस यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले 'पेरस सेंटर फॉर पीस अँड इनोव्हेशन' हे तंत्रज्ञान-नवोन्मेष आणि सामुदायिक सहकार्याचा संगम असलेले विशेष संशोधन केंद्र शुक्रवारी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्यासह भारतातून आलेल्या प्रतिनिधीमंडळासाठी खुले करण्यात आले. या ठिकाणी विविध क्षेत्रात चालणारी आघाडीची संशोधने, प्रोटोटाइप्स आणि आगामी तंत्रज्ञानाची मॉडेल्स प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. इस्रायलला 'स्टार्ट-अप नेशन' म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या संशोधनांचा इतिहास आणि भावी दिशा यांचे संपूर्ण माहितीपट इथे दाखवण्यात आले.
इस्रायलसोबत परस्पर समृद्धी, भविष्याची प्रगती व दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेच्या 66 विकासासाठी संतुलित, न्याय व समतोल करार करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे जात आहोत. या सर्वसमावेशक भागीदारीत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष हे प्रमुख घटक ठरतील. पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री
कंपन्या भारतासोबत सहकार्यास इच्छुक
इस्रायलच्या चेक पॉइंट, सायबर टेक यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या भारतासोबत सहकार्य करण्यास इच्छुक आहेत. सायबर सुरक्षा असो, मोबिलिटी असो, हवामानबदलाशी लढा देणे, कमी कार्बन उत्सर्जनासह स्टील उत्पादन असो किंवा मेड-टेक डिव्हायसेसचे क्षेत्र अशा ठिकाणी मिळून कार्य केल्यास नवोन्मेषाला उद्देश व नवीन जीवनपद्धती मिळू शकते, असे मंत्री गोयल म्हणाले.