इस्रायलचे राष्ट्रपती, पंतप्रधानांची मंत्री गोयल यांनी घेतली भेट; भागीदारी अधिक बळकट करण्यावर भर
By अतुल कुलकर्णी | Updated: November 24, 2025 10:04 IST2025-11-24T10:02:25+5:302025-11-24T10:04:28+5:30
गोयल यांनी पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष संदेश नेतन्याहू यांना दिला.

इस्रायलचे राष्ट्रपती, पंतप्रधानांची मंत्री गोयल यांनी घेतली भेट; भागीदारी अधिक बळकट करण्यावर भर
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
जेरुसलेम : भारताचे वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी इस्रायलच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्याचा समारोप करताना इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग आणि पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांची स्वतंत्र भेट घेतली. दोन्ही बैठकींमध्ये भारत–इस्रायल सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
गोयल यांनी सर्वप्रथम इस्रायलचे राष्ट्रपती हर्झोग यांची भेट घेऊन भारतीय जनतेच्या शुभेच्छा त्यांना कळवल्या. या भेटीत व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान–तंत्रज्ञान, नवोपक्रम, तसेच व्यापक आर्थिक सहकार्यासंदर्भातील विषयांवर सखोल चर्चा झाली. गोयल यांनी इस्रायली भागीदारांसाठी भारतातील वाढत्या संधींचा उल्लेख करताना, भारत–इस्रायल मुक्त व्यापार करार चर्चांच्या दिशेने उचललेल्या पहिल्या मोठ्या पावलाची माहिती दिली.
यानंतर गोयल यांनी पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष संदेश नेतन्याहू यांना दिला. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, शेती, पाणी व्यवस्थापन आणि नवोपक्रम क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावरील दिशा निश्चित केली.
सहकार्याला नवी चालना
भारताचे कौशल्य व इस्रायलची उच्च तंत्रज्ञान क्षमता एकत्र येऊन नवोपक्रम भागीदारीला मोठा वेग मिळू शकतो, असेही गोयल यांनी सोशल मीडियावर नमूद केले. गोयल यांच्या या भेटींमुळे दोन्ही देशांतील आर्थिक, तांत्रिक आणि रणनीतिक सहकार्याला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भागीदारी अधिक बळकट करू
नेतन्याहूपंतप्रधान नेतन्याहू यांनीही गोयल यांच्याशी झालेल्या भेटीबाबत ट्विट करून भारत–इस्रायल भागीदारी अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. भारत, इस्रायल आणि त्यानंतर युरोपपर्यंत जाणाऱ्या आर्थिक कॉरिडॉरच्या संकल्पनेलाही त्यांनी महत्त्वाचे पाऊल म्हटले. उभय देशांतील आर्थिक संबंधही वाढीला लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.