अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 19:28 IST2026-04-13T19:27:43+5:302026-04-13T19:28:13+5:30
Middle East Crisis: ११ एप्रिल रोजी ‘जग विक्रम’ हा भारतीय एलपीजी टँकर होर्मुझ पार करून अरब सागरात दाखल झाला.

अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
Middle East Crisis: अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे मध्यपूर्वेतील प्रमुख व्यापारी मार्ग असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरातील तणाव वाढला आहे. यामुळे भारतासाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या या भागात १५ भारतीय जहाज अडकले असून, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदल प्रयत्न करत आहे. आतापर्यंत १० जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ पार करून बाहेर पडली आहेत.
११ एप्रिल २०२६ रोजी ‘जग विक्रम’ हा भारतीय एलपीजी टँकर होर्मुझ पार करून अरब सागरात दाखल झाला. या जहाजावर २०,४०० टन एलपीजी आणि २४ कर्मचारी होते. हे जहाज १५ एप्रिल रोजी मुंबईत पोहोचणार आहे. यापूर्वीही काही जहाजे सुरक्षितपणे भारतात पोहोचली असून, सुरुवातीला अडकलेल्या २५ जहाजांपैकी आता १० जहाजे बाहेर काढण्यात यश आले आहे.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, फारसच्या आखातात अजूनही १५ भारतीय जहाज अडकलेली आहेत. यामध्ये एक एलएनजी जहाज, एक रिकामे एलपीजी जहाज, सहा कच्चे तेल वाहून नेणारे टँकर (पाच भरलेले आणि एक रिकामे), तीन कंटेनर जहाजे, एक ड्रेजर आणि एक केमिकल कार्गो जहाज यांचा समावेश आहे.
तणाव वाढल्यानंतर भारतीय नौदलाने विशेष टास्क फोर्स तयार केली असून, होर्मुझपरिसरात अडकलेल्या जहाजांना नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशनची मदत दिली जात आहे. जहाजे होर्मुझपार केल्यानंतर त्यांना गल्फ ऑफ ओमान आणि उत्तर अरब सागरात नौदलाच्या संरक्षणाखाली सुरक्षित आणले जात आहे. या संपूर्ण परिस्थितीवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्रालयाकडून लक्ष ठेवले जात आहे.
विशेष म्हणजे, गुरुग्राम येथील Information Fusion Centre – Indian Ocean Region केंद्राकडून २४ तास या समुद्री हालचालींवर नजर ठेवली जात आहे. हे केंद्र २८ देशांसोबत समन्वय साधत रिअल-टाइम माहिती शेअर करत आहे. भारतासाठी सध्याची परिस्थिती विशेष महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत उर्वरित जहाजांना सुरक्षित बाहेर काढणे हे भारतासाठी प्राधान्याचे काम असून, पुढील काही दिवसांत या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.