सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:36 IST2025-05-15T15:32:14+5:302025-05-15T15:36:08+5:30
एका व्यक्तीने २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या ब्युटी सलूनमध्ये भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने प्रवेश केला आणि नंतर तिच्यावर गोळीबार केला.

सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना एका मेक्सिकन सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मेक्सिकोच्या जलिस्कोमधील ग्वाडालजारा शहरात घडली. एका व्यक्तीने २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व्हॅलेरिया मार्केझ हिच्या ब्युटी सलूनमध्ये भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने प्रवेश केला आणि नंतर तिच्यावर गोळीबार केला.
सदर घटना घडली, तेव्हा मार्केझ तिच्या 'ब्लॉसम द ब्युटी लाउंज' या सलूनमधून लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती. तिच्या लाईव्ह स्ट्रीमिंग फुटेजमध्ये, व्हॅलेरिया एका टेबलावर बसून बोलताना दिसली होती. तर, घटनेच्या काही सेकंद आधी, तो "ते येत आहे" असे म्हणत असल्याचे ऐकू आले होते. काही वेळाने पार्श्वभूमीवर गोळीबाराचा आवाज आला आणि मार्केझ टेबलावर कोसळली. त्यानंतर एक माणूस तिचा फोन उचलताना दिसला. व्हिडीओ संपण्यापूर्वी लाईव्हस्ट्रीमवर त्याचा चेहरा काही क्षणांसाठी दिसला.
मार्केझचा जागीच मृत्यू
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मार्केझच्या छातीत, डोक्यात गोळी लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती देताना रिपोर्टमध्ये म्हटले की, एक बंदूकधारी मोटारसायकलवरून आला आणि तिला भेटवस्तू देण्याचे नाटक करत होता. मार्केझचे इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर जवळपास २००,००० फॉलोअर्स होते. ती लाईव्ह करत असतानाच त्याने तिच्यावर गोळीबार केला.
मार्केझच्या हत्येचा तपास फेमिसाईडच्या प्रोटोकॉल अंतर्गत केला जात आहे. या हल्लेखोराबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.