सलीम बग्गा : ‘पाकिस्तानी ट्रम्प’ची सोशल मीडियावर धूम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:12 IST2025-01-18T09:11:41+5:302025-01-18T09:12:19+5:30

बऱ्याचदा त्याचं प्रत्यंतरही आलं आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही एकदम दोन टोकांचा आहे.

Meet Saleem Bagga, Donald Trump's Lookalike In Pakistan Who Sings And Sells Kheer | सलीम बग्गा : ‘पाकिस्तानी ट्रम्प’ची सोशल मीडियावर धूम 

सलीम बग्गा : ‘पाकिस्तानी ट्रम्प’ची सोशल मीडियावर धूम 

जगात सध्या कोणाची सर्वाधिक चर्चा असेल तर ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा शपथविधी केवळ काही तासांवर आला आहे. त्यामुळे अख्ख्या जगाचं लक्ष त्यांच्यावर लागलं आहे. तेही आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अतिशय उत्साहित असून, जगभरातल्या नेत्यांना या समारंभासाठी आमंत्रण, या सोहळ्याची जंगी तयारी यात ते व्यस्त आहेत.  ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ बऱ्यापैकी वादग्रस्त राहिला होता. केवळ त्यांचा पहिला कार्यकाळच नव्हे, तर त्यांचं सगळं आयुष्यच वादांनी आणि चमत्कृतींनी भरलेलं होतं, आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. ते केव्हा काय बोलतील आणि काय करतील याचा काहीही नेम नाही. त्यांची धोरणंही अमेरिकेच्या आतापर्यंतच्या धोरणांपेक्षा वेगळी असू शकतात.

बऱ्याचदा त्याचं प्रत्यंतरही आलं आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही एकदम दोन टोकांचा आहे. धडाक्यात निर्णय घेणारे, मागच-पुढचा काहीही विचार न करता बोलून आणि करून मोकळे होणारे, काहीही झालं तरी आपला हट्ट आणि मनमानी पूर्ण करणारे नेते म्हणून काही जणांना ते प्रचंड आवडतात, विशेषत: तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता बऱ्यापैकी चांगली आहे, त्याचवेळी काहीही विधानं करणारे आणि मनमानी व्यक्तिमत्त्व म्हणून अनेकांना त्यांच्याविषयी राग, तिटकारा आहे. असं असतानाही आता दुसऱ्यांदा ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताहेत. 

२० जानेवारीला त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी समारंभ होईल, पण त्याआधीच त्यांनी हमासला इशारा दिला होता, इस्त्रायली ओलिसांची सुटका करा, युद्ध थांबवा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. त्यांच्या या ‘धमकी’चा परिणाम म्हणा किंवा आणखी काही, युद्धविराम दृष्टिपथात आला. आता इतक्या काही घटना घडत असताना पाकिस्तानातील एका बातमीनं अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेक जणांना ट्रम्प पाकिस्तानात दिसत आहेत. 

ट्रम्प काहीही करू शकतात, पण अशा मोक्याच्या क्षणी ते पाकिस्तानला कशाला जातील? - ते खरंही आहे, पण पाकिस्तानात ट्रम्प सध्या दिसताहेत हेही खरंच आहे. अर्थातच पाकिस्तानातील हे ट्रम्प म्हणजे त्यांचे ‘हमशकल’, डुप्लिकेट आहेत. त्यांचं नाव आहे सलीम बग्गा. ५३ वर्षीय सलीम हुबेहुब डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखेच दिसतात. त्यांच्यासारखाच चेहरा. त्यांच्यासारखेच केस. त्यांच्यासारखीच देहबोली. त्यांना पाहिलं की लोकांना वाटतं, हे डोनाल्ड ट्रम्पच आहेत. पण त्यांच्याशी बोलायला लागल्यावर कळतं, ही दुसरीच व्यक्ती आहे म्हणून. खरं तर सलीम स्वत:च खूप बोलके आहेत आणि लोकांना पाहिल्यावर ते स्वत:च त्यांच्याशी बोलायला येतात.  

पाकिस्तानच्या साहिवाल जिल्ह्यात राहाणाऱ्या या सलीमभाईंचा एक छोटासा ठेला आहे. तिथे ते कुल्फी आणि खीर विकतात. त्यांचा आवाजही चांगला आहे आणि त्यांना गाण्याचा शौक आहे. पंजाबी भाषेत गाणं गात गात पाकिस्तानातल्या रस्त्यांवर ते कुल्फी आणि खीर विकतात. सलीम यांना पाहिल्यावर अनेक लोकही त्यांच्याकडे येतात आणि हौसेनं त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतात. सलीम यांच्याबरोबरचा हाच फोटो मग सोशल मीडीयावर टाकून ‘ट्रम्प यांच्यासोबतचा फोटो’ म्हणून ते मिरवून घेतात. ‘पाकिस्तानी ट्रम्प’ म्हणून सलीम खूपच प्रसिद्ध आहेत. 

Web Title: Meet Saleem Bagga, Donald Trump's Lookalike In Pakistan Who Sings And Sells Kheer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.