Video - अग्नितांडव! फिलिपाईन्समध्ये भीषण आग; १००० घरं जळून खाक, ५००० लोक बेघर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:50 IST2026-02-05T10:50:02+5:302026-02-05T10:50:40+5:30
फिलिपाईन्समधील एका छोट्या बेटावर लागलेल्या भीषण आगीने प्रचंड हाहाकार माजवला असून हजारो लोक रस्त्यावर आले आहेत.

Video - अग्नितांडव! फिलिपाईन्समध्ये भीषण आग; १००० घरं जळून खाक, ५००० लोक बेघर
फिलिपाईन्समधील एका छोट्या बेटावर लागलेल्या भीषण आगीने प्रचंड हाहाकार माजवला असून हजारो लोक रस्त्यावर आले आहेत. सरकारी वृत्तसंस्था 'PNA' ने दिलेल्या माहितीनुसार, ही आग रात्री १० च्या सुमारास'बारंगाय लामियन' परिसरात लागली. या आगीत तब्बल १,००० घरं पूर्णपणे जळून राख झाली आहेत. वेगवान वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केलं आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात एकच खळबळ उडाली.
या आगीने संपूर्ण परिसरात मोठं नुकसान झालं आहे. PNA नुसार, या दुर्घटनेनंतर ५,००० हून अधिक लोकांना जमीन आणि समुद्र अशा दोन्ही मार्गांनी सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. सध्या या विस्थापित नागरिकांना दोन तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.
Philippines: Massive fire razed ~1,000 homes in Barangay Lamion, Bongao, Tawi-Tawi (Feb 3–4).
— GeoTechWar (@geotechwar) February 4, 2026
Fueled by winds, blaze was out by early morning. No deaths.
Hundreds evacuated. Relief: food, water, tents; medical & security aid ongoing pic.twitter.com/nRYT6mdbmb
बुधवारी बोंगाओ स्थानिक प्रशासनाने, 'बंगसमोरो सामाजिक सेवा आणि विकास मंत्रालय' आणि प्रांतीय सरकारसोबत मिळून प्राथमिक मदत कार्य सुरू केलं. तसेच बोंगाओ ग्रामीण आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना विस्थापित लोकांच्या उपचारासाठी आणि वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी तैनात करण्यात आलं आहे.
बोंगाओ नगर आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन कार्यालयाने (MDRRMO) माहिती दिली की, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेक 'फूटब्रिज'जळाल्यामुळे आग विझवताना आणि बचाव कार्यात अडथळे आले. अग्निशमन दलाने पहाटे २ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवलं. सध्या प्रशासन आग लागण्याचं नेमकं कारण शोधत असून मालमत्तेच्या एकूण नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.