स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाच्या जल्लोषात भीषण आग; ४० हून अधिक मृत्यू, १०० जखमी; मृतांची संख्या वाढण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:49 IST2026-01-02T09:47:33+5:302026-01-02T09:49:26+5:30
जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाच्या जल्लोषात भीषण आग; ४० हून अधिक मृत्यू, १०० जखमी; मृतांची संख्या वाढण्याची भीती
क्रॅन्स-मोंटाना (स्वित्झर्लंड) : स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या स्विस आल्प्समधील एका बारमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमादरम्यान भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४०हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, किमान १०० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
व्हॅलिस कॅन्टनमधील ‘ले कॉन्स्टेलेशन’ या बारमध्ये सेलिब्रेशन सुरू असताना ही आग लागली. व्हॅलिस कॅन्टनच्या पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, मृतांचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. सध्या बळींची ओळख पटवण्याचे आणि त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मृतांची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही.
आरोग्य यंत्रणेवर ताण
जखमींची संख्या इतकी मोठी आहे की, प्रादेशिक रुग्णालयातील आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर फुल्ल झाले असल्याने कमी पडत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव
दोन महिला प्रत्यक्षदर्शींनी फ्रेंच वृत्तवाहिनीला सांगितले की, एका बारमनने बारमधील एका महिला कर्मचाऱ्याला आपल्या खांद्यावर बसवले होते. त्या महिलेच्या हातात बाटलीमध्ये एक पेटलेली मेणबत्ती होती, ज्याचा स्पर्श लाकडी छताला झाला. यामुळे छताने तत्काळ पेट घेतला आणि काही वेळातच संपूर्ण छत कोसळले. आगीतून वाचण्यासाठी लोक खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर उड्या मारत होते. धूर आणि आगीच्या ज्वाळांमधून बाहेर पडण्यासाठी लोकांची धावपळ उडाली होती.
...म्हणून भीषणता वाढली
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही आग ‘एम्ब्रेसमेंट जनरलाइज’ प्रकारची होती. यामध्ये आगीमुळे निर्माण होणारे ज्वलनशील वायू अचानक पेट घेतात, ज्याला इंग्रजीत ‘फ्लॅशओव्हर’ किंवा ‘बॅकड्राफ्ट’ म्हटले जाते.
यामुळे आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केले. त्यामुळे आणि जीना व बाहेर पडण्याचा दरवाजा अत्यंत अरुंद असल्याने उपस्थितांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. हा कोणताही दहशतवादी हल्ला नसल्याचे ॲटर्नी जनरल बीट्रिस पिलॉड यांनी स्पष्ट केले.
खबरदारीचे आवाहन -
क्रॅन्स-मोंटाना हे जगातील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने येथे मोठी गर्दी आहे. आधीच वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण असल्याने, स्थानिक प्रशासन आणि पर्यटकांना पुढील काही दिवस सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून इतर कोणत्याही अपघातामुळे यंत्रणेवर अधिक ताण येणार नाही.
जखमींना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि रुग्णवाहिकांची मदत घेतली गेली. यात अनेक देशांतील पर्यटकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.