Salwan Momika: स्वीडनमध्ये मशिदीसमोर निदर्शने करताना कुराण जाळणाऱ्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सलवान मोमिका असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घरात घुसून त्याची हत्या करण्यात आली. सलवान मोमिका याने २०२३ मध्ये कुराणची प्रत जाळली होती. यावरून मुस्लीम देशांनी प्रचंड टीका केली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलवान मोमिका यांच्या हत्येबद्दल समोर आलेल्या रिपोर्टनुसार, स्टॉकहोममध्ये वास्तव्याला असलेल्या सलवान मोमिका याची घरात घुसून हत्या करण्यात आली. सलवान मोमिका टिकटॉकवर लाईव्ह होता, त्याचवेळी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
न्यायालयात हजर करण्यापूर्वीच संपवलं
सलवान मोमिकाने इस्लामचा विरोध करत असताना २०२३ मध्ये कुराणची प्रत जाळली होती. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. स्टॉकहोम न्यायालयात या केसची सुनावणी होती. गुरूवारी सलवान मोमिका याला कोर्टात हजर व्हायचे होते, पण त्यापूर्वीच त्याची हत्या करण्यात आली. ही बातमी कळल्यानंतर न्यायालयातील प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्यात आली.
सलवान मोमिका आणि सलवान नजीम यांच्यावर एका धर्माविरोधात द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. दोघांनी स्टॉकहोममधील मशिदीबाहेर कुराणची प्रत जाळली आणि मुस्लीम धर्माबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती, अशी याचिका न्यायालयात आहे.
सलवान मोमिकाने कुराणची प्रत का जाळली होती?
सलवान मोमिका याने इस्लाम धर्माविरोधात निदर्शने करायची असल्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर त्याने निदर्शने करताना कुराणची प्रत जाळली होती.
२०२३ मध्ये निदर्शने करताना सलवान मोमिका म्हणाला होता की, अजूनही वेळ गेलेली नाही, स्वीडनने जागे व्हावे. ही लोकशाही आहे. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाहीये, पण आम्ही त्यांच्या विचारांच्या आणि प्रथांच्या विरोधात आहोत. मुस्लीम धर्म खूप नकारात्मक आहे. त्यामुळे जगभरात त्यावर बंदी घालायला हवी, असे त्याने म्हटले होते.