फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 20:56 IST2025-10-11T20:52:57+5:302025-10-11T20:56:11+5:30
गेल्या आठवड्यात राजीनामा देणारे सेबॅस्टिन लेकॉर्नू पुन्हा एकदा फ्रान्सचे पंतप्रधान बनले आहेत.

फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
पॅरिस:फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. एका आठवड्यापूर्वी राजीनामा देणारे सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी शनिवारी पुन्हा फ्रान्सचेपंतप्रधानपदाची शपथ घेतली. प्रचंड राजकीय गोंधळ आणि अराजकतेच्या काळात राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लेकोर्नू यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. यामुळे देशातील राजकीय अस्थिरता आणि सत्ताधारी पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
गेल्या आठवड्यात दिलेला राजीनामा
लेकोर्नू यांनी एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन त्यांच्या जागी दुसऱ्याची नियुक्ती करणार होते, परंतु शुक्रवारी रात्री अचानक मॅक्रॉन यांनी लेकोर्नू यांच्याच नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे, लेकोर्नू यांच्या सेंटर-लेफ्ट गटाला राष्ट्रीय असेंब्लीमध्ये बहुमत नाही. तसेच त्यांना स्वतःच्या पक्षातून तीव्र टीकेचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान म्हणून लेकोर्नू यांचा दुसरा कार्यकाळ फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याची शेवटची संधी म्हणून पाहिला जातोय.
दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर नियुक्ती झाल्यानंतर सेबॅस्टन लेकोर्नू म्हणाले की, माझ्या पदासाठी फार उमेदवार नव्हते. परिस्थिती अनुकूल असेपर्यंतच मी या पदावर असेन. लेकोर्नू यांनी मान्य केले की, संसदेत सत्ताधारी गटातील फूट आणि विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अविश्वास ठरावाचाही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले की, तुम्ही माझी मदत करा आणि देशासाठी एकत्र या, नाहीतर परिस्थिती आणखी वाईट होईल.
वर्षभरातील चार पंतप्रधान बदलले
गेल्या वर्षभरात फ्रान्समधील मॅक्रॉन यांचे सरकार वारंवार कोसळत आहे. मॅक्रॉन यांनी वर्षभरात चार पंतप्रधान बदलले आहेत. एकीकडे राजकीय अस्थिरता अन् दुसरीकडे वाढत्या कर्जामुळे गुंतवणूकदार, बाजारपेठा आणि युरोपियन भागीदार देश चिंतेत आहेत. लेकोर्नूंची पुनर्नियुक्ती ही फ्रान्ससाठी राजकीय स्थैर्य आणि आर्थिक सुधारणा यांचा शेवटचा प्रयत्न म्हणून पाहिली जात आहे. मात्र, बहुमत नसल्याने आणि वाढत्या जनआक्रोशामुळे त्यांचे पंतप्रधानपद किती काळ टिकेल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.