इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:07 IST2025-06-21T18:07:00+5:302025-06-21T18:07:28+5:30
भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि फक्त किरकोळ नुकसान झाले आहे

इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
Earthquake in Iran: इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्धाचं वातावरण असतानाच शुक्रवारी इराणलाभूकंपाचा धक्का बसला. इराण आणि इस्रायलने शनिवारी पुन्हा एकमेकांवर हल्ला केला आहे. त्याच्या एक दिवस आधी इराणने अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत कुठलीही वाटाघाटी करणार नाही असं स्पष्ट केले होते. युरोपीय देश दोन्ही बाजूंमध्ये शांतता चर्चेसाठी सतत प्रयत्न करत आहेत.
शुक्रवारी उत्तर इराणच्या सेमनान प्रदेशात ५.१ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. तस्निम वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सेमनानच्या नैऋत्येस २७ किलोमीटर अंतरावर १० किलोमीटर खोलीवर भूकंप झाला.
इराणनं अणुशस्त्राची चाचणी केली आहे का?
या भूकंपामुळे आता इराणने एखादी अणुशस्त्राची चाचणी केली आहे का या नवीन चर्चांना उधाण आले आहे कारण हा भूकंप अंतराळ संकुल आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या शहराजवळ आल्याने यामुळे नवीन चिंता निर्माण झाल्या आहेत. इराणी सैन्याद्वारे चालवले जाणारे सेमनान स्पेस सेंटर आणि सेमनान क्षेपणास्त्र संकुल येथेच आहे.
इराणमध्ये दरवर्षी २,१०० भूकंप होतात
इराणी वृत्तसंस्था आयआरएनएने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि फक्त किरकोळ नुकसान झाले आहे. संघर्षग्रस्त हा देश जगातील सर्वात भूकंप प्रवण क्षेत्रातील देशांपैकी एक आहे, कारण इथं अल्पाइन-हिमालयीन भूकंपीय पट्ट्यावर वसलेला आहे, जिथे अरबी आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स एकत्र येतात. इराणमध्ये दरवर्षी साधारणपणे २,१०० भूकंप होतात ज्यापैकी १५ ते १६ भूकंप ५.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे असतात. २००६ ते २०१५ दरम्यान देशात ९६,००० भूकंप झाले. अण्वस्त्र चाचणीवेळी भूमिगत स्फोटांमुळे आणखी भूकंप होऊ शकतात. इंडिया टुडेच्या मते, यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूक्लियर-टेस्ट-बॅन ट्रीटी ऑर्गनायझेशन (CTBTO) आणि स्वतंत्र भूकंपशास्त्रज्ञांनी केलेल्या विश्लेषणाने अणुचाचण्यांबद्दलच्या चर्चा खोडून काढल्या आहेत.