काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अनेक फुटबॉलपटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 07:45 IST2025-03-11T07:44:36+5:302025-03-11T07:45:57+5:30
Boat Capsized In Congo : मुशीचे स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट अपघातानंतर आतापर्यंत जवळफास 30 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अनेक फुटबॉलपटू
काँगोमध्ये मोठा अपघात झाला आहे. येथे एक बोट उलटल्याने २५ जणांचा मृत्यू झाला. या बोटीवर अनेक फुटबॉलपटूही होते. एपीने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित प्रांत प्रवक्ते अॅलेक्सिस म्पुटू यांनी म्हटले आहे की, हे खेळाडू रविवारी रात्री माई-न्डोम्बे प्रांतातील मुशी शहरात एका सामना खेळून परतत असताना त्यांना घेऊन जाणारी बोट क्वा नदीत उलटली.
मुशीचे स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट अपघातानंतर आतापर्यंत जवळफास 30 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. खरे तर, रात्रीच्या वेळी काँगोमध्ये असे बोट अपघात सामान्य आहेत. कारण येथील वाहतुकीचे मुख्य साधन नद्याच आहेत.
असं आहे बोट अपघातांचं कारण -
काँगोमध्ये रस्ते आणि इतर वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नसलेल्या दुर्गम भागांतील नागरिकांसाठी नद्या हा वाहतुकीचा एक मुख्य पर्याय आहे. महत्वाचे म्हणजे, काँगोतील १० कोटींहून अधिक लोक हे नद्यांवर अवलंबून आहेत. मात्र सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची कमतरता आणि बोटिंची गर्दी, यामुळे अशा प्रकारचे अपघात सर्वसामान्य झाले आहेत.
गेल्या काही वर्षांत अनेकांचा मृत्यू -
काँगोमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बोट अपघात झाले असून यांत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे मुबलक रस्ते नसल्याने लोकांना नदी मार्गाने प्रवास करावा लागतो. मात्र असुरक्षित बोटींमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होता. हे अपघात रोखण्यासाठी, सरकार सागरी सुरक्षा नियम लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही अशा अपघातांमध्ये दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.