Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 08:01 IST2025-07-27T08:01:06+5:302025-07-27T08:01:45+5:30
Video - डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना शनिवारी अमेरिकन एअरलाइन्सचं विमान AA३०२३ च्या लँडिंग गियरमध्ये आग लागली.

फोटो - आजतक
डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना शनिवारी अमेरिकन एअरलाइन्सचं विमान AA३०२३ च्या लँडिंग गियरमध्ये आग लागली. लँडिंग गियरला आग लागल्यानंतर विमानातील सर्व १७३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे.
डेनवर अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बोईंग ७३७ मॅक्स विमान डेनवरहून मियामीसाठी रनवे ३४L वरून उड्डाण घेत असताना ही घटना घडली. विमानाच्या टायरमध्ये समस्या निर्माण झाली, ज्यामुळे विमानाला रनवेवर थांबवावं लागलं. डेनवर विमानतळाने पुष्टी केली की, सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षित आहेत. गेटवरील एका व्यक्तीला किरकोळ दुखापतींमुळे वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
NEW - American Airlines Boeing 737 Max catches fire at Denver airport, passengers evacuated after landing gear combusts.pic.twitter.com/D8kC3D2uDL
— Disclose.tv (@disclosetv) July 27, 2025
फ्लाईटअवेअरच्या मते, विमान दुपारी १:१२ वाजता गेट C३४ वरून निघणार होतं, परंतु दुपारी २:४५ वाजता टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली. प्रवाशांना बसेसद्वारे टर्मिनलवर नेण्यात आले. फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन (FAA) ने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
अमेरिकन एअरलाइन्सने नंतर पुष्टी केली की विमानात टायरशी संबंधित समस्या होती, ज्यामुळे ते सेवेतून काढून टाकण्यात आलं आहे आणि त्यांच्या देखभाल टीमकडून त्याची चौकशी केली जात आहे. शनिवारी संध्याकाळी, डेनवर अग्निशमन विभागाने विमानातील आग आटोक्यात आणली असल्याची माहिती दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रनवेवर मध्यभागी उभ्या असलेल्या विमानाच्या टायरला आग लागल्याचं दिसत आहे.