अमेरिकेच्या जेलमध्ये असूनही मादुरो यांची गर्जना; भर न्यायालयात ट्रम्प यांना दिले थेट चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:00 IST2026-01-06T09:59:55+5:302026-01-06T10:00:27+5:30
मॅनहॅटनमधील फेडरल कोर्टात हजर केले असताना मादुरो यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेला आव्हान दिले आहे.

अमेरिकेच्या जेलमध्ये असूनही मादुरो यांची गर्जना; भर न्यायालयात ट्रम्प यांना दिले थेट चॅलेंज!
व्हेनेझुएलाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहेत, पण त्यांची जिद्द आणि आक्रमकता तसूभरही कमी झालेली नाही. मॅनहॅटनमधील फेडरल कोर्टात हजर केले असताना मादुरो यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेला आव्हान दिले आहे. "मी आजही वेनेझुएलाचा अधिकृत राष्ट्राध्यक्ष आहे," असे गर्जत त्यांनी अमेरिकेच्या भूमीवरूनच आपली ताकद दाखवून दिली आहे. मादुरो यांच्या या धाडसा मागे अमेरिकेतील एक असा वकील आहे, जो अशक्य वाटणाऱ्या केसेस जिंकण्यासाठी जगप्रसिद्ध आहे.
कोर्टात मादुरो यांचा 'पावरफुल' अवतार
जिल्हा न्यायाधीश एल्विन हेलरस्टीन यांच्यासमोर मादुरो यांना हजर करण्यात आले. यावेळी मादुरो म्हणाले, "मला माझ्या देशातून बळजबरीने उचलून आणले गेले आहे. मी एक सन्माननीय नागरिक असून माझ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे." अमेरिकेने लावलेले ड्रग्ज तस्करी आणि नार्को-टेररिझमचे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. ट्रम्प यांनी वेनेझुएलावर ताबा मिळवण्याचे संकेत दिले असतानाच, मादुरो यांच्या या विधानाने आंतरराष्ट्रीय राजकारणात ठिणगी पडली आहे.
कोण आहे तो 'जादूगार' वकील?
मादुरो यांची केस अमेरिकेचे दिग्गज ट्रायल लॉयर बॅरी पोलॅक लढत आहेत. पोलॅक यांचे नाव घेतल्याशिवाय अमेरिकेतील हाय-प्रोफाइल केसेसची चर्चा पूर्ण होत नाही. विकिलिक्सचे संस्थापक जूलियन असांजे यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात पोलॅक यांचा सिंहाचा वाटा होता. ज्या केसेसमध्ये निकाल विरोधात जाण्याची १००% शक्यता असते, तिथे पोलॅक चमत्कार घडवून आणतात. १७ वर्षे तुरुंगात राहिलेल्या एका निरपराध व्यक्तीची सुटका करून त्यांनी १३.४ मिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई मिळवून दिली होती. नॅशनल सिक्युरिटी आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांमध्ये त्यांचा हातखंडा असल्याने मादुरो यांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
कुख्यात तुरुंगात मादुरो यांचा मुक्काम
मादुरो यांना सध्या न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथील एका वादग्रस्त तुरुंगात ठेवण्यात आले आहे. हा तोच तुरुंग आहे जिथे संगीतकार आर केली आणि सीन 'डिडी' कॉम्ब्स यांसारखे हाय-प्रोफाइल गुन्हेगार राहिले आहेत. या तुरुंगात सध्या मेक्सिकन ड्रग कार्टेलचे प्रमुखही बंद आहेत. विशेष म्हणजे, याच तुरुंगात असलेले होंडुरासचे माजी राष्ट्राध्यक्ष हर्नांडेझ यांना अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी माफी देऊन सोडून दिले होते. त्यामुळे मादुरो यांच्या नशिबात काय आहे, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.