कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच, २ लाखांहून अधिक लोकांना घरं सोडण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:24 IST2025-01-10T10:23:02+5:302025-01-10T10:24:00+5:30
Los Angeles wildfires : या भीषण आगीमुळे ३ दिवसांत २८ हजार एकर क्षेत्र जळून खाक झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच, २ लाखांहून अधिक लोकांना घरं सोडण्याचे आदेश
Los Angeles wildfires : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आगीचे तांडव सुरूच आहे. कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग आता अधिक तीव्र झाली आहे. या आगीमुळे २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉस एंजेलिस हे हॉलिवूड सेलिब्रिटींचे घर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी लागलेली आग हॉलिवूडसाठीही हे मोठे नुकसान करुन गेली आहे. या भीषण आगीमुळे ३ दिवसांत २८ हजार एकर क्षेत्र जळून खाक झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
भीषण आगीमुळे पॅरिस हिल्टनसह अनेक कलाकारांचे बंगले जळून खाक झाले आहेत आणि एक लाखाहून अधिक लोक आपली घरे सोडून गेले आहेत. दरम्यान, कॅलिफोर्नियातील आग दर तासाला एका नवीन भागाला वेढत आहे. जोरदार वाऱ्यांमुळे आगीने आग आणि वादळाचे रूप धारण केले आहे. आगीमुळे, हॉलिवूड हिल्सवरील अमेरिकन चित्रपट उद्योगाची ओळख असलेल्या हॉलिवूड बोर्डला जळून खाक होण्याचा धोका आहे.
हॉलिवूड हिल्समधील जगातील अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसच्या स्टुडिओना आग लागली आहे. यामध्ये अनेक हॉलिवूड स्टार्सच्या घरांचाही समावेश आहे. ५ भागात पसरलेली ही आग अजूनही भीषण आहे. काही भागात आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरमधून पाणी फवारले जात आहे.
कॅलिफोर्नियातील आगीमुळे झालेल्या विध्वंसामुळे १ लाखाहून अधिक लोक बेघर झाले आहेत. ४ लाख घरांमध्ये वीज संकट आहे. २० हजार एकरमध्ये पसरलेल्या या आगीमुळे ६०,००० इमारती धोक्यात आल्या आहेत. या आगीमुळे जवळपास ५७ अरब डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीची भीषणता दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये आगीने संपूर्ण परिसर खाक झाल्याचे पाहायला मिळत आहे.