लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 07:39 IST2025-08-18T07:30:54+5:302025-08-18T07:39:04+5:30
दुसरे पर्व: अर्थनीतीच्या चर्चेसाठी! भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर जागतिक व्यापारातील भूमिकांचे होणार विश्लेषण

लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकमत समूहाच्या वतीने ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’चे दुसरे पर्व लंडनमध्ये १८ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या परिषदेमध्ये जगभरातील अर्थतज्ज्ञ, उद्योगपती, धोरणकर्ते आणि नवउद्योजक सहभागी होणार आहेत. या परिषदेत भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणारी वाटचाल, गुंतवणुकीच्या संधी, धोरणात्मक बदल यावर सकारात्मक चर्चा होईल.
चार प्रमुख परिसंवादांत अर्थशास्त्र, पायाभूत सुविधा, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान, विकासात महिलांचे योगदान आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक यांसारख्या विषयांवर मंथन होईल. आर्थिक प्रगतीचा वेध घेणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिका अधोरेखित करणाऱ्या या 'कन्व्हेन्शन'मध्ये जगभरातील मान्यवर आपला नवा दृष्टिकोन मांडतील. 'कन्व्हेन्शन'चे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी सिंगापूरमध्ये झालेल्या पहिल्या परिषदेला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यात देशाच्या आर्थिक विकासाचा नारा देण्यात आला होता. त्यानंतर यंदा ब्रिटनच्या ऐतिहासिक राजधानीत, लंडनमध्ये हा भव्य सोहळा होत आहे.
भारताच्या आर्थिक प्रवासातील संधी, अडथळे आणि उपाययोजना यावर आर्थिक क्षेत्रातील मान्यवर मंथन करतील. भारताचा आर्थिक पाया अधिक भक्कम करण्यासाठी कोणत्या धोरणांची गरज आहे, खासगी क्षेत्राची भूमिका किती महत्त्वाची आहे, डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाढता प्रभाव, तसेच जागतिक पातळीवर भारताचे स्थान कसे मजबूत करता येईल, यावर रचनात्मक संवाद होईल. यामुळे ही परिषद भारताच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संवादातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. कारण भारत आता जागतिक पटलावर एक मोठी आर्थिक सत्ता म्हणून उदयास येत आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचा आर्थिक दृष्टिकोन मांडण्यासाठीची ही सुवर्णसंधी असणार आहे. जगभरातील तज्ज्ञ, उद्योजक, धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि नेते यांच्या विचारमंथनातून धोरणनिर्मितीची प्रक्रिया अधिक व्यावहारिक होणार असून त्याचा फायदा देशाला होईल. भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होत असलेल्या प्रवासात अशा परिषदा नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. ही परिषद म्हणजे केवळ संवादाची संधी नसून, भारताच्या आर्थिक विश्वातील स्थान अधिक बळकट करणारी एक धोरणात्मक बाब ठरणार आहे.
‘लोकमत’ समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या नेतृत्वाखाली हे 'कन्व्हेन्शन' होत आहे. लोकमत हा पहिला माध्यम-समूह आहे ज्याने लंडनमध्ये जागतिक परिषद आयोजित केली. यामुळे भारतीय पत्रकारितेचा दर्जा आणि विश्वासार्हता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. लोकमतने नव्या दृष्टिकोनातून जागतिक विचारमंथनचे व्यासपीठ उभे केले आहे. या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार असून अनेक मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
लंडनमध्येच ‘कन्व्हेन्शन' का ?
लंडनचे आर्थिक सत्ता म्हणून महत्त्व हे केवळ बँका आणि शेअर बाजारापुरते मर्यादित नाही, तर ते जगभरातील आर्थिक धोरणे, गुंतवणूक, वित्तीय व्यवहार, आणि व्यावसायिक संधींना दिशा देणारे केंद्र आहे. त्यामुळेच लंडनमध्ये होणाऱ्या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ सारख्या उपक्रमांना जागतिक अर्थकारणाच्या पातळीवर महत्त्व प्राप्त आहे.
द इकॉनॉमिक पॉवर हाऊस ऑफ इंडिया
‘महाराष्ट्र: द इकॉनॉमिक पॉवर हाऊस ऑफ इंडिया’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. महाराष्ट्राने औद्योगिक केंद्र, आर्थिक राजधानी आणि नवाविचारांचे माहेरघर म्हणून नावलौकिक मिळवला आहे. हा परिसंवाद महाराष्ट्राची ही ओळख अधिक बळकट करेल आणि जागतिक व्यासपीठावर त्याचे महत्त्व अधोरेखित करेल. या परिसंवादात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील, मागास व बहुजनकल्याण, दुग्धविकासमंत्री अतुल सावे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार सुनील तटकरे, माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, तसेच बांधकाम व्यावसायिक पराग शाह सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचे मॉडरेटर ‘लोकमत मीडिया ग्रुप’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा असतील.
लंडन येथे ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ हा प्रतिष्ठित कार्यक्रम होत असून, याचा अत्यंत आनंद आहे. या जागतिक परिषदेच्या माध्यमातून राजकारण, व्यवसाय, प्रशासन, माध्यम, सामाजिक सेवा आणि भारतीय प्रवासी अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर नेते व परिवर्तनकर्ते एकत्र येणार आहेत. ‘इंडिया-द इमर्जिंग ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर : चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज’ या विषयाभोवती केंद्रित असलेला हा कार्यक्रम भारताचा गौरवशाली वारसा, गतिशील वर्तमान आणि आशादायक भविष्याचा उत्सव साजरा करेल. यंदाच्या परिषदेत विशेष भर महाराष्ट्राच्या, देशाच्या आर्थिक प्रवासातील निर्णायक भूमिकेवर असेल.
- डॉ. विजय दर्डा, चेअरमन, लोकमत समूह.
भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर जागतिक चर्चा, महिलांचे भारताच्या आर्थिक विकासातील अव्यक्त सामर्थ्य, पायाभूत सुविधा म्हणजे ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली, महाराष्ट्राच्या आर्थिक सामर्थ्यावर लंडनमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ महत्त्वाचे ठरणार आहे. आर्थिक प्रगतीचा आढावा, उद्योग-गुंतवणुकीसाठीचे धोरण, पायाभूत सुविधांतील बदल या सर्वच अंगांचे सखोल विचारमंथन होणार आहे.
-राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत मीडिया ग्रुप.
पायाभूत सुविधा ठरणार गेमचेंजर
‘कन्व्हेन्शन’मध्ये पायाभूत सुविधांवर होणाऱ्या परिसंवादात राज्याचे कॅबिनेटमंत्री मंगलप्रभात लोढा, न्याती ग्रुपचे चेअरमन डॉ. नितीन न्याती, रांकाचे संचालक प्रमोद रांका, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, शेलाडिया असोसिएट्स इन्क. (मेरीलँड, यूएसए) चे अध्यक्ष मनीष कोठारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक नलिन गुप्ता, अजंता फार्माचे उपाध्यक्ष मधुसूदन अग्रवाल आणि आमदार विक्रांत पाटील यांचा समावेश आहे. सत्राचे समन्वयन एमआयसीआय रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन ग्रुपच्या मनन शाह करतील.
अर्थव्यवस्थेच्या विकासावर मंथन
देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा जागतिक व्यासपीठावर घेण्यात येणार आहे. कन्व्हेन्शनमधील पहिल्या परिसंवादात जागतिक तज्ज्ञ, गुंतवणूकदार व धोरणकर्ते एकत्र येऊन आर्थिक धोरणे, बाजारातील चढ-उतार, आणि भविष्यातील संधी-आव्हानांवर मंथन करणार आहेत. देशातील गुंतवणुकीचे नवे मार्ग, व्यापारी संबंध तसेच आर्थिक विकासास चालना देण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे असतील, यावर चर्चा होईल. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, प्रवीण मसालेवालेचे संचालक विशाल चोरडिया, जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साळी, अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष अजिंक्य डी. वाय. पाटील, राज्यसभा खासदार अजित गोपछडे आणि बँकर व पार्श्वगायिका अमृता फडणवीस यांचा समावेश आहे.
सखींचे आर्थिक विकासातील योगदान
महिलांनी मूल्यसंस्कार, देशाची समृद्ध संस्कृती आणि वारसा जपत उद्योग, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. घरापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत आणि आता व्यापक अर्थव्यवस्थेपर्यंत त्यांचा प्रभाव आपल्याला विस्तारताना दिसत आहे. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या ध्येयासाठी त्यांच्या योगदानावर चर्चा घडेल. या सत्रात पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, नागरी विकास, सामाजिक न्यायमंत्री माधुरी मिसाळ, माजी राजदूत मोनिका मोहत, बँकर व पार्श्वगायिका अमृता फडणवीस, मुकुंद माधव फाउंडेशनच्या सहसंस्थापक व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक ऋतू छाब्रिया, पॅरामाउंट जेम्स (न्यूयॉर्क)च्या सहसंस्थापिका रजनी पन्नालाल जैन, आमदार श्वेता महाले आणि इंट्रिया ज्वेल्सच्या संस्थापक व ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा कोठारी यांचा सहभाग असेल. सूत्रसंचालन आमदार देवयानी फरांदे करणार आहेत.
यांचा होणार सन्मान : या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे मान्यवरांना प्रदान करण्यात येणारे पुरस्कार. भारत भूषण, ग्लोबल सखी आणि कोहिनूर ऑफ इंडिया, गुजरात रत्न अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार त्यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दिले जाणार आहेत.
भारत भूषण - देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना ‘भारत भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येईल. राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा हा गौरव असेल.
कोहिनूर ऑफ इंडिया - ज्यांनी आपल्या कार्यातून देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे, अशा कर्तृत्ववान व्यक्तींना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र रत्न - महाराष्ट्राच्या मातीला समृद्ध करणाऱ्या व्यक्तींचा हा सन्मान असेल. उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
लोकमत ग्लोबल सखी - महिलांचे योगदान आता घरापुरते न राहता उद्योग, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेपर्यंत विस्तारले आहे. अशा महिलांना ‘लोकमत ग्लोबल सखी’ पुरस्काराने गौरवले जाईल.
गुजरात रत्न पुरस्कार - गुजरात राज्याच्या सर्वांगीण प्रगती आणि विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘गुजरात रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.