इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:43 IST2026-04-09T11:43:17+5:302026-04-09T11:43:55+5:30
Lebanon shaken by Israeli attacks : या भीषण हल्ल्यांत २५४ जणांचा मृत्यू झाला असून ८९० हून अधिक जण जखमी झाल्याचे समजते. अनेक जण ढिगाऱ्याखाली आहेत...

इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
इस्रायल आणि ईरानमध्ये सीजफायर झाल्यानंतर, इस्रायलने बुधवारी रात्री लेबनानमध्ये आतापर्यंतचा सर्वात भीषण हवाई हल्ला केला. अवघ्या १० मिनिटांत इस्रायलने १०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. हे हल्ले हिज्बुल्लाहचे कमांड सेंटर आणि लष्करी तळांवर करण्यात आले, असा दावा इस्रायलने केला आहे. या भीषण हल्ल्यांत २५४ जणांचा मृत्यू झाला असून ८९० हून अधिक जण जखमी झाल्याचे समजते.
अनेक जण ढिगाऱ्याखाली -
यासंदर्भात, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांत किमान २५४ लोक मारले गेले आहेत. हा आकडा आणखी वाढू शकतो. ८९० जण जखमी झाले आहेत. बेरूत, दक्षिण लेबनान आणि बेका घाटीमध्ये झालेल्या या हल्ल्यांनंतर बचावकार्य अद्यापही सुरूच आहे. युद्धाच्या या धगधगत्या आगीत आतापर्यंत १७०० हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेला असून, यात १३० मुलांचा समावेश आहे. तर दुसरीकडे, इस्रायलने हिज्बुल्लाहचे ११०० सैनिक मारल्याचा दावा केला आहे.
इराणचा इशारा -
युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही, इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले सुरूच ठेवले आहेत. याच्या निषेधार्थ, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली, जी युद्धविराम करारानंतर खुली करण्यात आली होती. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी लेबनॉनवरील हल्ले थांबवण्यासंदर्भात इशाराही दिला आहे. ते म्हणाले, जर लेबनॉनवरील हल्ले थांबवले गेले नाहीत, तर इराण शस्त्रसंधी करार रद्द करेल. त्यांनी 'एक्स' (X) वर लिहिले, "इराण-अमेरिका युद्धविरामाच्या अटी स्पष्ट आहेत आणि अमेरिकेने हे ठरवले पाहिजे की, ते खरोखरच युद्धविरामाची अंमलबजावणी करणार की इस्रायलमार्फत युद्ध सुरूच ठेवणार. कारण या दोन्ही गोष्टी सोबत चालू शकत नाही."
एवढेच नाही तर, "संपूर्ण जग लेबनॉनमधील हिंसाचार बघत आहे. आता निर्णय अमेरिकेच्या हातात आहे. अमेरिका आपले आश्वासन कितपत पाळतो हे संपूर्ण जग पाहत आहे," असेही अब्बास यांनी म्हटले आहे.