पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 20:10 IST2025-12-31T20:05:13+5:302025-12-31T20:10:08+5:30
दहशतवादी हाफिज सईद नंतर लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्ला कसूरीचे चिथावणीखोर वक्तव्य

पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
India vs Pakistan: लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर आणि एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरी याने पुन्हा एकदा भारताला जाहीर धमकी दिली आहे. पाकिस्तानमधून समोर आलेल्या एका नवीन व्हिडिओ संदेशात कसूरीने काश्मीरमध्ये 'जिहाद' सुरू ठेवण्याची आणि भारताकडून होणाऱ्या कारवाईचा बदला घेण्याची दर्पोक्ती केली आहे.
धमकीचा नेमका विषय काय?
नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सैफुल्ला कसूरीने प्रामुख्याने काश्मीरमधील जलसंपत्तीवर भाष्य केले आहे. भारताने 'सिंधू जल करारा'बाबत (Indus Waters Treaty) घेतलेल्या भूमिकेवर त्याने संताप व्यक्त केला. "काश्मीरमधील नद्या आणि धरणे आमचीच असतील," असे म्हणत त्याने भारतीय नेतृत्वाला लक्ष्य केले. तसेच, भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' या कारवाईमुळे झालेल्या नुकसानीचा बदला घेण्याची धमकीही त्याने दिली आहे.
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड
सैफुल्ला कसूरी हा तोच दहशतवादी आहे, ज्याने २२ एप्रिल २०२५ रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारन कुरणात पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याचा कट रचला होता. या हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा बळी गेला होता. कसूरी सध्या पाकिस्तानात मुक्तपणे फिरत असून तो तिथे मोठ्या रॅलींमध्ये सहभागी होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
भारताने यापूर्वीच सैफुल्ला कसूरीला 'मोस्ट वॉन्टेड' घोषित केले असून त्याच्या विरोधात सबळ पुरावे दिले आहेत. मात्र, पाकिस्तानने अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट, कसूरी सारखे दहशतवादी पाकिस्तानातून उघडपणे भारताविरुद्ध गरळ ओकत आहेत. या धमकीनंतर भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरसह सीमेजवळील भागात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी आणि पर्यटनाला धक्का पोहोचवण्यासाठी दहशतवादी संघटना सातत्याने असे व्हिडिओ प्रसिद्ध करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.