हुकूमशहा किम जोंग उनच्या क्रूरतेचा कळस; कोरोनाचे नियम मोडणाऱ्यावर झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 11:55 IST2020-12-05T11:40:18+5:302020-12-05T11:55:18+5:30
Kim Jong Un : कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन करणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

हुकूमशहा किम जोंग उनच्या क्रूरतेचा कळस; कोरोनाचे नियम मोडणाऱ्यावर झाडल्या गोळ्या
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हा त्याच्या क्रूरतेसाठी लोकप्रिय आहे. त्याचा क्रूर चेहरा हा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान उत्तर कोरियामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन करणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेले नियम मोडले म्हणून एका व्यक्तीला सर्वांसमोर गोळी घालण्यात आली आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांना पाहताच क्षणी गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर कोरियात हुकुमशहाच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच लोकांना घाबरवण्यासाठी उत्तर कोरियाने चीन सीमेवर अँटी एयरक्राफ्ट बंदुकाही तयार ठेवल्या असल्याची माहिती मिळत आहे.
डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, 28 नोव्हेंबर रोजी उत्तर कोरियाच्या सेनेने हुकुमशाह किम जोंग उन यांच्या आदेशानंतर एका व्यक्तीवर सार्वजनिकरित्या गोळ्या झाडण्याचा आदेश देण्यात आला. कोरोना काळातील नियम मोडून चीनमधून सामानाची तस्करी करताना ही व्यक्ती आढळल्याचा आरोप हा गोळ्या झाडण्यात आलेला व्यक्तीवर करण्यात आला. त्यानंतर त्याला ही शिक्षा देण्यात आली.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले म्हणून किम जोंगने याआधीही आपल्या पाच अधिकाऱ्यांना मृत्यू दंड दिला आहे. हुकूमशहा किमच्या आदेशावरून या अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी किमच्या धोरणावरही टीका केली होती. या चर्चेवेळी त्यांनी देशात औद्योगिक सुधारणेची आश्यकता असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही, तर उत्तर कोरियाने आपल्यावरील बंधने दूर करण्यासाठी परराष्ट्रीय मदत घ्यायला हवी, असे मतही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. यानंतर 30 जुलैला त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.