इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 10:03 IST2025-07-06T10:03:04+5:302025-07-06T10:03:27+5:30
इराण आणि इस्राइलमधील युद्धानंतर पहिल्यांदाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी शनिवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले.

इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
इराण आणि इस्राइलमधील युद्धानंतर पहिल्यांदाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी शनिवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. ते आशूरा निमित्त आयोजित शोकसमारंभात उपस्थित होते.
इराणी सरकारी दूरदर्शनने या कार्यक्रमाची थेट चित्रफीत प्रसारित केली, ज्यामध्ये खामेनी पारंपरिक काळ्या पोशाखात कार्यक्रमस्थळी प्रवेश करताना दिसले होते. त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित जमावाने “लब्बैक या हुसैन” अशा घोषणांनी सभागृह दणाणून टाकले.
इराणचे 'सुप्रीम लीडर' खामेनी ही उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे, कारण १३ जूनपासून सुरू झालेल्या इराण-इस्राइल संघर्षानंतर खामेनी प्रथमच जनतेसमोर आले आहेत. यापूर्वी त्यांनी केवळ आधीच रेकॉर्ड केलेले व्हिडीओ संदेश जाहीर केले होते.
गैरहजेरीमुळे उठले होते अनेक प्रश्न!
खामेनी काही काळ सार्वजनिकरीत्या न दिसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत तसेच नेतृत्वाबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते. विरोधक आणि आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा असा अंदाज होता की, युद्धाच्या पार्श्वभूमीवर खामेनी सुरक्षित स्थळी, कदाचित बंकरमध्ये लपले असावेत.
मात्र, इराणी अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर ठेवण्यात आले होते. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात इस्रायली हवाई हल्ले अधिक तीव्र होते, त्यामुळे त्यांची सुरक्षा महत्त्वाची होती.
नेतृत्वाच्या स्थैर्याचा संदेश
राजकीय विश्लेषकांच्या मते, खामेनी यांची ही सार्वजनिक उपस्थिती केवळ धार्मिक स्वरूपाची नसून, ती एक प्रतीकात्मक राजकीय संदेशही आहे. या माध्यमातून इराणकडून देशांतर्गत जनतेला तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे की, युद्धाच्या स्थितीतदेखील देशाचे नेतृत्व सक्रिय, स्थिर आणि नियंत्रणात आहे.
या सार्वजनिक उपस्थितीमुळे खामेनी यांच्या आरोग्याबाबत पसरलेले संशय दूर झाले असून, इराणमध्ये नेतृत्व अजूनही सशक्त असल्याचा संदेशही जगभरात पोहोचता झाला आहे.