"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 22:32 IST2025-06-23T22:31:18+5:302025-06-23T22:32:04+5:30
मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचे दर वाढू शकतात, अशी चिंता त्यांना (ट्रम्प) वाटू लागली आहे...

"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
इराण-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती शिगेला पोहोचल्या आहेत. एक वेळ कच्च्या तेलाचा दर 81.40 अमेरिकन डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला होता. यातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (23 जून, 2025) तेलाचे दर कमी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचे दर वाढू शकतात, अशी चिंता त्यांना वाटू लागली आहे.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, "सर्वांनी तेलाच्या किमती कमी ठेवाव्यात, मी बघत आहे. आपण शत्रूच्या हाताने खेळत आहात. असे करू नका." याशिवाय, ट्रम्प यांनी अमेरिकन ऊर्जा विभागाला संबोधित करत आणखी एक पोस्ट केली, यात त्यांनी त्यांना "ड्रिल, बेबी, ड्रिल" करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि "माझा अर्थ आत्ताच आहे," असे म्हटले आहे.
इराणचे महत्व... जागतिक बाजारपेठेत चिंता -
जागतिक तेल पुरवठ्यासंदर्भात इराणचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींसंदर्भात चिंता वाढली आहे. OPEC+ च्या एकूण उत्पादनात इराणचा वाटा सुमारे एक तृतीयांश आहे. महत्वाचे म्हणजे, तो या गटातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. यामुळे त्याच्याकडून होणाऱ्या पुरवठ्यात कसल्याही प्रकारचा व्यत्यय आला, तर त्याचा फटका जागतिक ऊर्जा बाजारपेठांना बसू शकतो. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर, इराणने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली तर, हे प्रकर्षाने जाणवू शकते. कारण हा एक महत्त्वाचा शिपिंग मार्ग आहे येथून जगातील सुमारे २० टक्के तेलाची आयात-निर्यात होते.
किती वाढू शकतात दर -
इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आहे. यामुळे आता, होर्मुझच्या सामुद्रधुनीत कसलाही अडथळा निर्माण झाला, तर कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामुळे अमेरिकास्थित WTI ८० ते ८५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाण्याची शक्यता आहे.