जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 05:41 IST2025-10-08T05:41:50+5:302025-10-08T05:41:57+5:30
‘क्वांटम टनलिंग’च्या शोधासाठी सन्मान

जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
स्टॉकहोम : यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट आणि जॉन मार्टिनिस या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. स्वीडनमधील रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली.
‘मॅक्रोस्कोपिक क्वांटम टनेलिंग व एनर्जी क्वांटायझेश’मधील संशोधनाला पुरस्कार दिला गेला आहे. या शोधामुळे वैज्ञानिकांना मोठ्या प्रणालींमध्ये क्वांटम टनेलिंग कसे कार्य करते, हे समजून घेणे व नियंत्रित करणे शक्य झाले.
मिशेल एच. डेवोरेट
मूळ फ्रान्सचे, सध्या अमेरिकन शास्त्रज्ञ
क्वांटम इलेक्ट्रो-डायनेमिक्स,
सुपरकंडक्टिंग क्युबिट्समध्ये संशोधन
जॉन एम. मार्टिनिस
अमेरिकन शास्त्रज्ञ,
क्वांटम इलेक्ट्रो-डायनेमिक्स सुपरकंडक्टिंग क्यूबिट्स, क्वांटम कंप्यूटिंगमध्ये संशोधन
जॉन क्लार्क
मूळ इंग्लडचे, सध्या अमेरिकन शास्त्रज्ञ
सुपरकंडक्टिव इलेक्ट्रॉनिक्स आणि क्वांटम टँलिंग आणि ऊर्जा क्वांटाइजेशनमध्ये संशोधन
क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग म्हणजे काय?
क्वांटम टनेलिंग ही अशी प्रक्रिया आहे, ज्यात सूक्ष्म कण एखाद्या अडथळ्याला (बॅरिअरला) धडकून परत न येता थेट त्या अडथळ्यातून आरपार जाऊन पुढे सरकतात. पारंपरिक भौतिकशास्त्रानुसार हे अशक्य मानले जाते.
आपण पाहतो की चेंडू भिंतीवर आदळला तर तो परत येतो; पण क्वांटम जगतातील लहान कण कधी कधी ती भिंत भेदून दुसऱ्या बाजूस पोहोचतात. यालाच क्वांटम टनलिंग म्हणतात.
नोबेल समितीचे म्हणणे... नोबेल समितीचे अध्यक्ष ओले एरिक्सन म्हणाले, “शंभर वर्षांपूर्वी विकसित झालेली क्वांटम मेकॅनिक्स आजही नवनवीन शोधांमुळे आपल्याला अचंबित करते. यंदाच्या नोबेल विजेत्यांच्या शोधामुळे भविष्यात सुपर सुरक्षित कोड्स (क्वांटम क्रिप्टोग्राफी), अतिवेगवान संगणक (क्वांटम कॉम्प्युटर्स) आणि अतिशय अचूक सेन्सर (क्वांटम सेन्सर्स) बनविणे शक्य होईल.”