जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 08:37 IST2026-01-10T08:36:57+5:302026-01-10T08:37:18+5:30
Japan NRA Phone Loss News: जपानच्या न्यूक्लियर रेग्युलेशन ऑथॉरिटीचा स्मार्टफोन शांघाय विमानतळावर हरवला. गोपनीय संपर्क माहिती चीनच्या हाती लागल्याची भीती. वाचा सविस्तर बातमी.

जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
टोकियो/शांघाय: जपानच्या 'न्यूक्लियर रेग्युलेशन ऑथॉरिटी' (NRA) मधील एका कर्मचाऱ्याचा अधिकृत स्मार्टफोन चीन दौऱ्यावर असताना गहाळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या फोनमध्ये जपानच्या अणुऊर्जा केंद्रांच्या सुरक्षेशी संबंधित आणि दहशतवादविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांची अत्यंत गोपनीय माहिती असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे जपानच्या राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ही माहिती चीनच्या हाती लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी नोव्हेंबर २०२५ मध्ये वैयक्तिक सहलीसाठी चीनमधील शांघाय येथे गेला होता. ३ नोव्हेंबर रोजी शांघाय विमानतळावर सुरक्षा तपासणी दरम्यान त्याचा अधिकृत स्मार्टफोन हरवला. ही बाब तीन दिवसांनंतर त्याच्या लक्षात आली. जपानच्या अणुऊर्जा विभागाने या घटनेची माहिती आता सार्वजनिक केली असून, जपानच्या वैयक्तिक माहिती संरक्षण आयोगाकडे याबद्दलचा अहवाल सोपवला आहे.
कोणती माहिती होती धोक्यात?
या स्मार्टफोनमध्ये अणुभट्ट्यांची सुरक्षा, चोरी आणि दहशतवाद रोखण्यासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आणि त्यांचे वैयक्तिक संपर्क क्रमांक होते. ही माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध नसते. फोन हरवल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या ओळखी उघड होण्याची आणि भविष्यात अणुऊर्जा केंद्रांच्या सुरक्षेला बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जपानची कडक पावले
या घटनेनंतर जपानच्या अणुऊर्जा नियामक संस्थेने आपल्या नियमावलीत मोठा बदल केला आहे. आता कोणत्याही कर्मचाऱ्याला संस्थेचा अधिकृत स्मार्टफोन परदेशात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यापूर्वी आणीबाणीच्या काळात संपर्कात राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना हे फोन सोबत ठेवणे अनिवार्य होते. जपान सध्या फुकुशिमा आपत्तीनंतर बंद पडलेल्या आपल्या मोठ्या अणुभट्ट्या पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात असतानाच ही सुरक्षा चूक झाल्याने सरकारवर टीका होत आहे.