जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:27 IST2025-10-29T13:26:53+5:302025-10-29T13:27:21+5:30
Pakistan Jaish-e-Mohammad, Jamaat ul-Mominaat: अझहरने दावा केलाय की, 'जमात-उल-मोमिनत'मध्ये सामील होणारी महिला मृत्यूनंतर थेट जन्नतमध्ये जाईल.

जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
Pakistan Jaish-e-Mohammad, Jamaat ul-Mominaat: पाकिस्तानचे समर्थन असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JEM) ने आता त्यांच्या दहशतवादी मोहिमेत एक नवा प्लॅन आखल्याचे उघड झाले आहे. जैशकडून आला महिलांनी ट्रेनिंग दिले जात असून, त्यांची महिला जिहादी ब्रिगेड तयार करण्याचे काम सुरू आहे. संघटनेचा नेता मौलाना मसूद अझहरचा २१ मिनिटांचा एक ऑडिओ संदेश व्हायरल झाला आहे, ज्यात 'जमात-उल-मोमिनत' नावाच्या नवीन महिला शाखेची घोषणा करण्यात आली आहे आणि त्याची संपूर्ण रूपरेषा मांडण्यात आली आहे.
महिलांसाठी 'दौरा-ए-तस्किया'
बहावलपूरमधील मरकझ उस्मान ओ अली येथून हा ऑडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. तिथून अझहरने महिलांची भरती, प्रशिक्षण आणि धार्मिक कट्टरपंथी शिकवणीसाठी सविस्तर ब्लूप्रिंट दिली होती, असा दावा आहे. मसूद अझहरच्या मते, ज्याप्रमाणे पुरुष जैश दहशतवादी 'दौरा-ए-तरबियत' नावाचा १५ दिवसांचा कोर्स करतात, त्याचप्रमाणे महिलांना 'दौरा-ए-तस्किया' नावाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर 'दौरा-आयत-उल-निसा' हा दुसरा टप्पा असेल, ज्यामध्ये त्यांना इस्लामिक धर्मग्रंथानुसार महिला जिहाद कसे करू शकतात हे शिकवले जाईल.
संघटनात्मक रचना आणि कडक नियम
अझहरने आपल्या भाषणात दावा केला की 'जमात-उल-मोमिनतमध्ये सामील होणारी कोणतीही महिला मृत्यूनंतर थेट जन्नतमध्ये जाईल. पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात जमात-उल-मोमिनतची एक शाखा स्थापन केली जाईल, ज्याचे नेतृत्व 'जिल्हा मुंतझिमा' करेल. या महिला सदस्यांना कोणत्याही गैर-महरम पुरुषाशी फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे बोलण्यास मनाई असेल.
अझहरच्या बहिणींचे दहशतवादाशी 'कनेक्शन'
मागील तपासात असे दिसून आले आहे की, अझहरने त्याची बहीण सादिया अझहर हिला महिला शाखेच्या प्रमुखपदी नियुक्त केले आहे. त्याच्या इतर बहिणी, समीरा अझहर (उम्मे मसूद) आणि आफिरा फारूक (पुलवामा हल्लेखोर उमर फारूकची विधवा पत्नी) देखील या टीमचा भाग आहेत. या महिला २५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ऑनलाइन वर्गांद्वारे भरती मोहीम राबवत आहेत. हे वर्ग अशा ४५ महिलांसाठी आहेत, ज्यांचे पती किंवा नातेवाईक भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत मारले गेले आहेत. 'शोबा-ए-दावत' नावाच्या प्रचार मोहिमेचा भाग म्हणून नवीन भरतींना प्रेरित करण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.