बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
By अतुल कुलकर्णी | Updated: November 24, 2025 06:28 IST2025-11-24T06:27:54+5:302025-11-24T06:28:36+5:30
कारमधील सेफ्टी फीचर्स जास्त महत्त्वाचे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
जेरुसलेम : बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी जास्त महत्त्वाची आहे, त्यादृष्टीने आपली या क्षेत्रातील इस्रायलच्या उद्योगपतींशी चर्चा झाली आहे. भारताची या क्षेत्रात मोठी मागणी आहे. त्यामुळे आपल्याकडे हे तंत्रज्ञान आले तर त्याच्या किमतीदेखील मोठ्या प्रमाणावर कमी होतील, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्याेगमंत्री पीयूष गोयल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
भारत-इस्रायल व्यापारी शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी रविवारी मंत्री गोयल यांनी जेरुसलेम येथे ‘ड्रायव्हरलेस’ कारचा अनुभव घेतला. भारतात अशा बिना ड्रायव्हरच्या कारची सध्या गरज नसली, तरी यातील सेफ्टी फीचर्स अतिशय उपयोगी ठरू शकतील, असे गोयल म्हणाले. भारतात अशा कारला जेवढी मागणी आहे त्या प्रमाणात उत्पादन झाले तर या तंत्रज्ञानाची किंमत ३० टक्क्यांपर्यंत कमी होईल, असे मत इस्रायली कंपन्यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
अशी आहे ‘ड्रायव्हरलेस’ कार, तुम्ही नुसते बसायचे
समोरच्या मोठ्या स्क्रीनवर कुठे ट्रॅफिक लाइट्स आहेत, ज्या ठिकाणी जायचे आहे त्या रस्त्याचा नकाशा, तेथील वाहतूक अशा सगळ्या गोष्टी दिसतात. कुठे थांबायचे, कुठे किती स्पीड घ्यायची, याचे निर्णय कारमधील यंत्रणा घेते. कारमध्ये ११ कॅमेरे आहेत. समोरच्या बाजूचे दोन कॅमेरे १२० डिग्री अँगलने आजूबाजूची माहिती देतात. एक कॅमेरा २८० डिग्रीमधून ४५० ते ६०० मीटर दूरचे झूम कॅमेऱ्यासारखे दृश्य दाखवतो. गाडीला ५ रडार आहेत. त्यातून आजूबाजूच्या सगळ्या हालचाली स्पष्टपणे समोरच्या स्क्रीनवर दिसू शकतात.
हायड्रोपोनिक शेतीची पाहणी अन् भारतीय भेटीला
दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी इस्रायलचे वाणिज्य मंत्री वीर बरकत विशेष पाहुणे होते. पेन ड्राईव्हचा शोध कसा लागला याची गोष्ट इथे सांगण्यात आली. ‘किबुत्झ’ शेतात त्यांनी हायड्रोपोनिक शेती पाहिली. अतिशय कमी पाण्यात, कमी खतांमध्ये जवळपास सेंद्रिय उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादन कसे घेतले जाते ते बघण्यासारखे होते.
मुंबईत सेंटर ऑफ एक्सलन्स
कृषी क्षेत्रातील कंपनी मुंबईत सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करत आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रासोबत भारताला मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. त्याशिवाय बंगळुरूमध्ये ‘चेकपॉईंट’साठी जास्त जागा निर्माण होतील.