लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:05 IST2025-11-20T19:05:32+5:302025-11-20T19:05:44+5:30
चीनमधील ऐतिहासिक लाकडी वेनचांग पॅव्हेलियन मंदिर पर्यटकाच्या निष्काळजीपणामुळे जळून खाक. मेणबत्ती-अगरबत्तीने लागलेल्या आगीत १९९० मध्ये पुनर्निर्मित वास्तूचा नाश.

लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
बीजिंग: चीनच्या जिआंगसू प्रांतातील फेंगहुआंग पर्वतावर वसलेले आणि प्राचीन योंगकिंग मंदिर संकुलाशी जोडलेले असलेले ऐतिहासिक वेनचांग पॅव्हेलियन मंदिर एका भयंकर आगीत पूर्णपणे नष्ट झाले आहे. एका पर्यटकाने केलेल्या मेणबत्ती आणि अगरबत्ती निष्काळजीपणे लावल्यामुळे ही दुर्घटना घडली आणि काही मिनिटांतच तीन मजली लाकडी रचना कोसळली.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी ही आग लागली. दुर्घटनेच्या व्हिडिओमध्ये मंदिराच्या छताचे भाग खाली कोसळताना दिसत आहेत, तर आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर आकाशात पसरला होता.
अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात, एका पर्यटकाने मेणबत्ती निष्काळजीपणे हाताळल्यामुळे आग लागल्याची पुष्टी झाली आहे. वेनचांग पॅव्हेलियन पूर्णपणे लाकडी असल्याने, आग अत्यंत वेगाने पसरली आणि काही वेळेतच संपूर्ण इमारत जळून खाक झाली. तथापि, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ऐतिहासिक महत्त्व
हे पॅव्हेलियन ज्ञान आणि साहित्याचा देव असलेल्या 'वेनचांग' यांना समर्पित होते. जरी ही इमारत १९९० मध्ये पुनर्निर्मित केलेली असली तरी, त्याचा संबंध सुमारे १,५०० वर्षे जुन्या योंगकिंग मंदिर संकुलाशी आहे. स्थानिक प्रशासनाने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा मानके अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या स्थळाचा जीर्णोद्धार पारंपारिक स्थापत्यशैलीत केला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.