इस्रायलचा बेरूतमध्ये भीषण एअर स्ट्राईक; हिजबुल्लाहचा टॉप कमांडर झैद अली जुमा ठार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 08:05 IST2026-03-06T08:02:59+5:302026-03-06T08:05:23+5:30
इस्रायली हवाई दलाने गुरुवारी लेबनॉनची राजधानी बेरूतवर जबरदस्त एअर स्ट्राईक करत हिजबुल्लाहचा बडा कमांडर झैद अली जुमा याला कंठस्नान घातले.

इस्रायलचा बेरूतमध्ये भीषण एअर स्ट्राईक; हिजबुल्लाहचा टॉप कमांडर झैद अली जुमा ठार!
आखतात सुरू असलेला संघर्ष आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचला आहे. इस्रायली हवाई दलाने गुरुवारी लेबनॉनची राजधानी बेरूतवर जबरदस्त एअर स्ट्राईक करत हिजबुल्लाहचा बडा कमांडर झैद अली जुमा याला कंठस्नान घातले. या कारवाईमुळे हिजबुल्लाहला मोठा धक्का बसला असून संपूर्ण लेबनॉनमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
कोण होता झैद अली जुमा?
झैद अली जुमा हा हिजबुल्लाहच्या लष्करी फळीतील अत्यंत महत्त्वाचा मोहरा होता. तो दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा आर्टिलरी चीफ म्हणून कार्यरत होता. इस्रायलवर डागण्यात आलेल्या हजारो रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांमागे जुमाचाच मेंदू होता, असा दावा इस्रायली संरक्षण दलाने केला आहे. विशेष म्हणजे, २०१५ मध्ये माउंट डोव्ह येथे झालेल्या ज्या टँक-विरोधी हल्ल्यात इस्रायलचा एक अधिकारी आणि जवान शहीद झाले होते, त्या हल्ल्याचे नेतृत्वही जुमानेच केले होते.
बेरूतमध्ये बॉम्बचा पाऊस, नागरिकांची पळापळ
हल्ला करण्यापूर्वी इस्रायली सैन्याने बेरूतच्या दाट लोकवस्तीच्या दक्षिण उपनगरातील रहिवाशांना परिसर रिकामी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर शहरात एकच खळबळ उडाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने राजधानीतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नागरिकांनी घरे सोडल्यानंतर काही तासांतच इस्रायलने या भागावर एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्र हल्ले चढवून हिजबुल्लाहची ठिकाणे जमीनदोस्त केली.
Israel Defense Forces tweets, "ELIMINATED: Hezbollah firepower management commander Zaid Ali Jumaa in Beirut. Jumaa served as Hezbollah’s head of artillery in southern Lebanon and was responsible for launching thousands of rockets, missiles and UAVs from Lebanon toward Israel. He… pic.twitter.com/FOgL8GIKXP
— ANI (@ANI) March 5, 2026
संघर्षाची भीषण दाहकता
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील शत्रूत्व अधिकच पेटले आहे. हिजबुल्लाहने सोमवारी वर्षभरानंतर पहिल्यांदाच इस्रायलवर मोठा ड्रोन हल्ला केला होता, ज्याला इस्रायलने आता सडेतोड उत्तर दिले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या भीषण संघर्षात आतापर्यंत लेबनॉनमध्ये १२३ लोकांचा बळी गेला असून ८३ हजारांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत.
इस्रायलचा कडक इशारा
इस्रायलने लिटानी नदीच्या दक्षिण भागातील रहिवाशांनाही घरे खाली करण्याचा इशारा दिला आहे. "आपला जीव वाचवण्यासाठी त्वरित सुरक्षित स्थळी जा," अशा सूचना वारंवार दिल्या जात आहेत. हिजबुल्लाहच्या कमांड सेंटरला लक्ष्य करून त्यांना पूर्णपणे कमकुवत करण्याचा इस्रायलचा मनसुबा या कारवाईतून स्पष्ट दिसत आहे.