इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 07:31 IST2026-01-14T07:31:28+5:302026-01-14T07:31:52+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डझनभर आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता इस्त्रायलने देखील आक्रमक पाऊल उचलले आहे.

इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
जगाच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डझनभर आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता इस्त्रायलने देखील आक्रमक पाऊल उचलले आहे. इस्त्रायलने संयुक्त राष्ट्रांशी संबंधित ६ संस्थांसह एकूण ७ आंतरराष्ट्रीय संघटनांसोबतचे सर्व संबंध त्वरित तोडण्याची घोषणा केली आहे. इस्त्रायलने या संस्थांवर उघडपणे पक्षपाती आणि शत्रुत्वपूर्ण वागणूक देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नेमकं कारण काय?
इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. मंत्रालयानुसार, या संस्थांनी इस्त्रायलच्या विरोधात सातत्याने नकारात्मक भूमिका घेतली आहे. इस्त्रायलने स्पष्ट केले आहे की, जे लोक त्यांच्या अस्तित्वावर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात किंवा दहशतवादी संघटनांसोबत त्यांची तुलना करतात, अशा संस्थांशी कोणताही व्यवहार ठेवला जाणार नाही. विशेष म्हणजे, आगामी काळात आणखी काही संघटनांवरही अशीच कारवाई केली जाऊ शकते, असे संकेत इस्त्रायलने दिले आहेत.
लष्कराची तुलना थेट ISIS शी केल्याने संताप
इस्त्रायलने ज्या संस्थांशी संबंध तोडले आहेत, त्यात सशस्त्र संघर्षातील मुलांसाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधींचे कार्यालय प्रमुख आहे. २०२४ मध्ये या कार्यालयाने इस्त्रायली लष्कराला चक्क ब्लॅकलिस्ट केले होते. इस्त्रायलचा संताप या गोष्टीवर आहे की, या यादीत इसिस आणि बोको हरामसारख्या क्रूर दहशतवादी संघटनांच्या रांगेत इस्त्रायलसारख्या लोकशाही देशाचे नाव टाकण्यात आले. यामुळे जून २०२४ मध्येच इस्त्रायलने या कार्यालयाशी नाते तोडले होते.
महिलांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
दुसरीकडे, 'यूएन वूमन' या संस्थेवरही इस्त्रायलने गंभीर ताशेरे ओढले आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्त्रायली महिलांवर केलेल्या अमानुष लैंगिक छळाच्या घटनांकडे या संस्थेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा इस्त्रायलचा दावा आहे. या निषेधार्थ इस्त्रायलने या संस्थेच्या स्थानिक प्रमुखाला हटवण्यास भाग पाडले आणि आता या संस्थेसोबतचे सर्व सहकार्य अधिकृतपणे बंद केले आहे.
इतर कोणत्या संस्थांवर कारवाई?
इस्त्रायलने 'युएन एनर्जी', 'युएन अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन्स' आणि 'ग्लोबल फोरम ऑन मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट' यांसारख्या संस्थांमधूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्था इस्त्रायलच्या विरोधात एक व्यासपीठ म्हणून वापरल्या जात असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. तसेच UNCTAD आणि ESCWA सारख्या आर्थिक संस्थांशीही इस्त्रायलने फार पूर्वीच अंतर राखले आहे.
अमेरिकेच्या पावलावर पाऊल इस्त्रायलचा
हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयाशी मिळताजुळता आहे. ट्रम्प यांनी ७ जानेवारी रोजी अमेरिकेला ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर काढण्याची घोषणा केली होती. यामध्ये भारताच्या पुढाकाराने सुरू झालेल्या 'इंटरनॅशनल सोलर अलायन्स'चाही समावेश आहे. आता इस्त्रायलने देखील हीच आक्रमक भूमिका घेतल्याने जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.