खामेनेईंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात हिंसाचार; कराचीपासून PoKपर्यंत ३५ मृत्यू, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:38 IST2026-03-02T16:29:23+5:302026-03-02T16:38:37+5:30
Khamenei Death Pakistan: याच प्रकरणात १००हून अधिक लोक जखमीही झालेत

खामेनेईंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात हिंसाचार; कराचीपासून PoKपर्यंत ३५ मृत्यू, कारण काय?
Khamenei Death Pakistan: इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ले आणि सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत. कराचीपासून पाकव्याप्त काश्मीरपर्यंत सुरू असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत ३५ नागरिकांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. निदर्शनांदरम्यान झालेल्या गोळीबारात हे मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. परंतु पाकिस्तानने अद्याप याची पुष्टी केलेली नाही.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सर्वाधिक मृत्यू कराचीमध्ये
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, हिंसक निदर्शनांमध्ये कराचीमध्ये १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गिलगिटमध्ये सात, स्कार्दूमध्ये सहा आणि इस्लामाबादमध्ये सहा नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. सुरक्षा दल आणि यूएस मरीन कॉर्प्समधील चकमकीत हे सर्व नागरिक मृत्युमुखी पडले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परिस्थिती बिकट होताच, पंजाब प्रांताच्या सरकारने काल रात्री उशिरा संपूर्ण प्रांतातील रुग्णालयांमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर केली. इतर प्रांताच्या सरकारांनीही अलर्ट जारी केले आहेत. शिया बहुल भागात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
रुग्णालयांना प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर न करण्याचे निर्देश
सूत्रांचा दावा आहे की इस्लामाबादमधील काही रुग्णालयांना प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतर प्रांतांमधील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांनाही अशाच सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, सुरुवातीचे आकडे जाहीर झाल्यानंतर, रुग्णालये आता जखमी आणि मृतांच्या संख्येची माहिती देत नाहीत. परिस्थिती पाहता, अनेक शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि अधिकाऱ्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.