इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 22:15 IST2025-09-09T22:14:41+5:302025-09-09T22:15:46+5:30
महत्वाचे म्हणजे, हमासचे निर्वासित नेतृत्व गेल्या अनेक दिवसांपासून कतारमध्येच राहते. खरे तर, इस्रायल-हमास संघर्ष पुन्हा एकदा वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच इस्रायलने हे हल्ले केले आहेत.

इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
इस्रायलने युद्धाची व्याप्ती वाढवत आता कतारची राजधानी असलेल्या दोहावर बॉम्बिंग केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हे हल्ले हमास नेत्यांच्या खात्म्याच्या हेतूने करण्यात आले. कतार सरकारने या इस्रायली हल्ल्याचा निषेध केला आहे. याच बरोबर हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचेही म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, हमासचे निर्वासित नेतृत्व गेल्या अनेक दिवसांपासून कतारमध्येच राहते. खरे तर, इस्रायल-हमास संघर्ष पुन्हा एकदा वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच इस्रायलने हे हल्ले केले आहेत.
इमारतीत हमासचे अनेक सदस्य राहत होते -
अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार, "इस्रायलने दोहातील एका निवासी क्षेत्राला लक्ष्य केले आहे. यासंदर्भात बोलताना, कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल-अन्सारी म्हणाले, देश या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. हा हल्ला निवासी इमारतींवर करण्यात आला आहे. या इमारतीत हमासच्या राजकीय ब्युरोचे अनेक सदस्य राहत होते." एवढेच नाही तर, हे हल्ले, कतार आणि कतारच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात धोका दर्शवतात, असेही अल-अन्सारी यांनी म्हटले आहे.
"गाझातील युद्ध तेव्हाच संपेल, जेव्हा..." -
तत्पूर्वी, इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी रविवारी (यरुशलम येथे) गाझा युद्धासंदर्भात एक महत्त्वाचे विधान केले हते. ते म्हणाले होते, "गाझातील युद्ध तेव्हाच संपेल, जेव्हा सर्व ओलिसांची सुटका होईल आणि पॅलेस्टिनी गट हमास शस्त्रे खाली ठेवेल." महत्वाचे म्हणजे, जर इस्त्रायलने युद्ध थांबवले आणि गाझामधून आपले सैन्य मागे घेतले, तरच आपण सर्व ओलिसांची सुटका करू, अशी अट हमासने ठेवल्यानंतर, गिदोन सार यांनी हे विधान केले आहे.