इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 06:44 IST2025-06-13T06:43:10+5:302025-06-13T06:44:45+5:30
Israel Major Attack on Iran: आज इस्राइलकडून इराणवर तुफानी हवाई हल्ले चढवले असून, इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरानवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. इस्त्राइलने या हल्ल्यांच्या माध्यमातून इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन
गेल्या काही काळापासून इस्त्राइल आणि इराणमधील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला होता. दरम्यान, इस्त्राइलकडून इराणवर हल्ला होण्याची शक्यता काही दिवसांपासून वर्तवण्यात येत होती. दरम्यान, आज इस्राइलकडून इराणवर तुफानी हवाई हल्ले चढवले असून, इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरानवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. इस्त्राइलने या हल्ल्यांच्या माध्यमातून इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
क्षेपणास्त्रं आणि ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. इराणमधील नातांज आणि फोर्दो अणुकेंद्रांमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त आहे. तसेच तेहरानमधील इमाम खुमैनी विमानतळावरही स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्राइलने आपला सर्वात मोठा शत्रू असलेल्या इराणवर थेट हल्ला केल्याने आखाती देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.
दरम्यान, आखाती देशांमध्ये कोणत्याही क्षणी भीषण संघर्षाला तोंड फुटू शकतं, अशी भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त करून काही तास उलटत नाहीत तोच इस्राइलने इराणवर हा हल्ला चढवला आहे. मात्र या हल्ल्यामध्ये अमेरिकेचा कोणताही हात नसून, आम्ही इस्राइलला कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
इस्रालइकडून इराणमध्ये हल्ले करण्यात आल्यानंतर इराणकडून होणाऱ्या प्रत्युत्तरदाखल कारवाईच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून इस्राइलमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. इराणकडून कोणत्याही क्षणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होऊ शकतो, असे इस्राइलचे संरक्षणमंत्री इस्राइल काट्स यांनी म्हटले आहे.