खामेनेई जिवंत की मृत? इस्रायलचा दावा इराणने फेटाळला; सर्वोच्च नेत्याच्या निवासस्थानावर बॉम्बफेक, संपूर्ण जगात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 02:25 IST2026-03-01T02:24:15+5:302026-03-01T02:25:34+5:30
Israel Iran war updates 2026 इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई यांच्या मृत्यूच्या बातम्यांनी जगभरात खळबळ उडाली आहे. इस्रायलचा दावा आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेले स्पष्टीकरण काय आहे? वाचा सविस्तर बातमी.

खामेनेई जिवंत की मृत? इस्रायलचा दावा इराणने फेटाळला; सर्वोच्च नेत्याच्या निवासस्थानावर बॉम्बफेक, संपूर्ण जगात खळबळ
तेहरान/तेल अवीव: शनिवारी सकाळी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या चर्चांनी जोर धरला आहे. इस्रायलच्या 'चॅनल १२' ने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, खामेनेई या हल्ल्यात मारले गेले असण्याची दाट शक्यता आहे. मात्र, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत खमेनेई सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
नेमकी काय आहे स्थिती?
इस्रायलचा दावा: इस्रायली सैन्याने खामेनेई यांच्या तेहरानमधील निवासस्थानावर आणि कंपाऊंडवर सुमारे ३० पेक्षा जास्त शक्तिशाली बॉम्ब डागले. उपग्रहाद्वारे मिळालेल्या फोटोंमध्ये हे निवासस्थान पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सूचक विधान करत म्हटले की, "सर्व संकेत सांगत आहेत की हा हुकूमशहा आता आपल्यात नाही."
इराणचे स्पष्टीकरण: इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "माझ्या माहितीनुसार खामेनेई सुरक्षित आणि जिवंत आहेत. देशातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी आपापल्या जागी असून परिस्थिती नियंत्रणात आहे." इराणच्या सरकारी टीव्हीने खमेनेई लवकरच देशाला संबोधित करतील असेही संकेत दिले आहेत.
दोन बड्या नेत्यांचा मृत्यू निश्चित
दरम्यान, इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिरजादेह आणि आयआरजीसी कमांडर मोहम्मद पाकपोर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.