इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 05:57 IST2025-06-14T05:55:18+5:302025-06-14T05:57:25+5:30

Israel-Iran Tensions Update: ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्राइलने इराणमध्ये हवाई हल्ले करत अणुकेंद्र, लष्करी तळ, अणुशास्त्रज्ञ आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांनी लक्ष्य केल्यानंतर इस्राइल आणि इराणमधील संघर्षाने भयानक रूप धारण केले आहे.

Israel-Iran Tensions: Iran retaliates, hundreds of missiles and drones fired at Israel, explosions in Tel Aviv, some civilians injured | इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 

इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 

ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्राइलने इराणमध्ये हवाई हल्ले करत अणुकेंद्र, लष्करी तळ, अणुशास्त्रज्ञ आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांनी लक्ष्य केल्यानंतर इस्राइल आणि इराणमधील संघर्षाने भयानक रूप धारण केले आहे. आता इराणनेही ऑपरेशन प्रॉमिस सुरू करून इस्राइलवर जोरदार प्रतिहल्ला केला असून, इस्राइलच्या जवळपास प्रत्येक भागाला शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे इस्राइलमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना तातडीने तळघरांमध्ये आश्रय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, इस्राइलच्या संरक्षण यंत्रणांनी इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यातील बहुतांश क्षेपणास्त्रं रोखण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र या हल्ल्यात काही इस्राइली नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.

इस्राइल डिफेन्स फोर्सच्या मिलिट्री रेडियोने दिलेल्या माहितीनुसार इराणने इस्राइलवर सुमारे १०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणकडून होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्राइलमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर इराणने सुरू केलेलं ऑपरेशन टू प्रॉमिस हे मेजर जनरल मोहम्मद बाघेरी, आयआरजीसीचे प्रमुख मेजर जनरल होसेन सलामी आणि आयआरजीसी एअरोस्पेसचे कमांडर ब्रिगेडियर जनरल आमिर अली हाजिजादेह यांच्यासह इतर इराणी अधिकाऱ्यांच्या हत्येचा बदला आहे, असे इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.


दरम्यान, इराणकडून डागण्यात आलेल्या अनेक क्षेपणास्त्रांना यशस्वीरीत्या रोखण्यात आल्याचा दावा इस्राइलच्या सैन्यदलांनी केला आहे. देशाच्या अनेक भागात मदत आणि बचाव करणाऱ्या पथकांना तैनात करण्यात आलं आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर इस्राइलच्या सैन्याने नागरिकांना तळघरातून बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे इराणी हल्ल्याचा धोका तूर्तास कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत.

तेल अवीवमध्ये इराणकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये ३४ नागरिक जखमी झाले आहेत. तर एक महिला ढिगाऱ्याखाली अडकून गंभीर जखमी झाली आहे.
इस्राइल आणि इराणमध्ये पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचीही तातडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये अमेरिकेने इराणला सक्त इशारा दिल्याचं वृत्त आहे. जर अमेरिकेशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं तर इराणसाठी परिणाम भयंकर असतील, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकारी मेककॉय पिट यांनी म्हटले आहे. 

Web Title: Israel-Iran Tensions: Iran retaliates, hundreds of missiles and drones fired at Israel, explosions in Tel Aviv, some civilians injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.